मुंबई मराठी माणसाची, शिवसेनेची आणि ठाकरेंची आहे, मुंबईचा सातबारा कोरा करता येणार नाही; भाजपच्या आंदोलनावर संजय राऊत यांचा घणाघात

पुण्यातील सरकारी तंत्रशिक्षण महाविद्यालयातील मुख्याध्यापकांच्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यावरून वाद निर्माण झाला. याविरोधात भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी मुंबईत मोर्चे काढले. भाजपच्या या मोर्चाविरोधात शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली. ही मुंबई आजही मराठी माणसाची, शिवसेनेची, ठाकरेंची आहे. तुम्हाला ठाकरेंच्या बापाचा सातबारा कोरा करता येणार नाही, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला.

मुंबईत माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी अमित ठाकरे यांच्या निर्णयांचे समर्थ केले असून भाजपवर अत्यंत आक्रमक शब्दांत टीकास्त्र सोडले आहे.अमित ठाकरेंनी मोदींचा फोटो भिंतीवरून काढला. भाजपच्या लोकांना याचा एवढा राग का आला? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. हा महाराष्ट्राच्या मनातला संताप आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला मोदी नको एवढीच अमित ठाकरे यांची भूमिका होती. आणि ती योग्य आहे. प्रोटोकॉल, शिष्टाचार वैगरे सगळं ठिक आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांचा फोटो हा सरकारी कार्यालयात जोपर्यंत ते पदावर आहेत तोपर्यंत असावा लागतो. शाळा कॉलेजमध्ये नाही, असे संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांचा फोटो शिवरायांच्या बाजूला नकोच

पंडित नेहरू, महात्मा गांधी आणि बाळासाहेब ठाकरे, डॉ. आंबेडकर यांचे फोटो सदैव असतात. त्यांना शिष्ठाचाराची गरज नाही. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला मोदी नको ही भूमिका अमित ठाकरे यांनी घेतली असेल तर त्यात काही चूकीचं नाही. हा महाराष्ट्राच्य़ा मनातला उद्रेक, राग आणि संताप आहे. त्यांनी श्यामा प्रसाद मुखर्जी, राष्ट्रवादींच्या बाजूला मोदींचा फोटो लावावा. पण महाराजांच्या बाजूला फोटो लावणे हा शिवाजी महाराजांचा अपमान आहे, असे संजय राऊत म्हणाले. खोटी माणसं, असत्य माणसं ज्यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला त्यांचा फोटो हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला नको. अशी भूमिका घेत संजय राऊत यांनी भाजपचा समाचार घेतला.

तुम्हाला ठाकरेंच्या बापाचा सातबारा कोरा करता येणार नाही

अमित ठाकरेंविरोधात भाजपने काढलेल्या मोर्चावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, कसले मोर्चे काढता? मार खाल्लात ना काल? असा खोचक सवाल केला. ही मुंबई मराठी माणसाची आहे. ही मुंबई आजही शिवसेनेची, ठाकरेंची आहे. हे भाडोत्री गुंड आणून मोर्चे कसले काढताय. मुंबई ठाकरेंच्या बापाचीच आहे. तुम्हाला ठाकरेंच्या बापाचा सातबारा कोरा करता येणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेत त्यांनी भाजप नेत्यांवर तीव्र शब्दांत हल्लाबोल केला.

मुंबई ठाकरेंच्या बापाचीच असली पाहिजे, लोढा किंवा अदानींच्या बापाची नाही. भाजपचे लोकं मूर्ख आहेत, ते बिनबापाचे आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

पंतप्रधान मोदींनी परदेशी न फिरण्याचे तसेच सोनं खरेदी न करण्याचे आवाहन केले. यावरून संजय राऊत म्हणाले की, मोदींच्या कोटची बटणं सोन्याची आहेत. त्यांचा पेन सोन्याचा आहे. मोदी किर्गिझस्तानमधून हे सगळं बोलतात. स्वत: परदेशात फिरतात, स्वत: जत्रेला जातात परदेशात, स्वत: सोन्याचा पेन, सोन्याचा काडीचा चष्मा वापरतात आणि आम्हाला म्हणतात सोन वापरू नका.

वारंवार तरूणांचा विजय़ होतोय हे या देशात पहिलांदा घडतयं

संपूर्ण देशभरातील तरूणांवरील एफआयआर कोर्टाने रद्द केल्या आहेत. त्यामुळे येत्या 5 सप्टेंबर होणारा मोर्चा रद्द करण्यात आला. हा विजय आहे. वारंवार तरूणांचा विजय़ होतोय. या देशात पहिल्यांदा असं घडतयं. ज्या सुप्रिम कोर्टाने तरूणांना कॉक्रोच असं संबोधलं त्याच कोर्टाने या सगळ्या कॉक्रोचवर असलेले एफआयआर रद्द करण्याचा आदेश दिला. यासाठी मी त्याचे अभिनंदन करतो, असे संजय राऊत म्हणाले.

Comments are closed.