…तर आगारातून एकही एसटी सोडू देणार नाही; एनसीएमसी कार्ड नाही म्हणून महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सवलती का नाकारता? शिवसेनेचा इशारा
एनसीएमसी कार्ड नाही म्हणून १ सप्टेंबरपासून महिला आणि ज्येष्ठ नागरिकांकडून एसटीने फुलतिकिट घ्यायला सुरूवात केली.अनेकांकडे एनसीएमसी कार्ड असूनही कार्डमध्ये पैसे नाहीत याकारणामुळे सवलत नाकारली गेल्याने आज शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आज दुपारी रत्नागिरीतील एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारताना एनसीएमसी कार्ड नाही म्हणून सवलत नाकारू नका जोपर्यंत सर्वांची कार्ड काढून होत नाहीत तो पर्यंत पर्यायी व्यवस्था करा. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना भुर्दंड पडता कामा नये. जर वेळीच सुधारणा झाली नाही तर आगारातून एकही एसटी बाहेर पडून देणार नाही असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
शिवसेनेचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांच्या नेतृत्वाखाली आज शिवसैनिकांनी एसटीच्या विभागीय कार्यालयावर धडक दिली. यावेळी एनसीएमसी कार्ड नाही म्हणून कालपासून ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना तिकिटात असलेली सवलत नाकारून संपूर्ण दराने तिकिट खरेदी करायला लावले जात आहे. राज्य शासनाने सवलती दिल्या आहेत तर कार्ड नाही म्हणून तुम्ही सवलत का नाकारता? असा सवाल जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी उपस्थित केला. राजापूर पंचायत समितीचे माजी सभापती अभिजीत तेली यांनी काल राजापूरात घडलेले काही प्रसंग मांडताना प्रकरणे मारामारी पर्यंत गेली ती आम्ही जाऊन मिटवली. तुमच्याकडे कार्ड रिचार्ज करायला बॅलन्सही नव्हता मग प्रवाशांनी करायचे काय? कार्ड रिचार्ज करायला तुमच्याकडे बॅलन्स नसेल तर प्रवाशांनी संपूर्ण तिकिट काढून भुर्दंड का भरायचा? याला जबाबदार तुम्ही आहात.प्रवाशांना सवलती द्या अन्यथा प्रकरण तापेल असा इशारा तेली यांनी दिला.
रत्नागिरी तालुकाप्रमुख मयुरेश्वर पाटील यांनीही अधिकाऱ्यांना धारेवर धरत प्रवाशांना नाहक त्रास देऊ नका. त्यांना सवलती मिळाल्याच पाहिजेत असे ठणकावून सांगितले. यावेळी दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख दत्ता कदम, उप जिल्हाप्रमुख रवींद्र डोळस, लांजा तालुका प्रमुख युवराज हांदे, माजी सभापती अभिजीत तेली, रत्नागिरी तालुका प्रमुख मयुरेश्वर पाटील, उपतालुका प्रमुख विजय देसाई,रत्नागिरी शहर प्रमुख प्रशांत साळुंखे, पावस विभाग प्रमुख किरण तोडणकर, आसगे विभाग प्रमुख महिला तालुका प्रमुख ममता जोशी, महिला शहर प्रमुख सेजल बोराटे, लांजा महिला संघटिका आसावरी मांडवकर,नगरसेविका फौजिया मुजावर,शिरगाव महिला विभाग प्रमुख आस्था धांगडे, कोतवडे महिला विभाग प्रमुख साक्षी साळुंखे, लांजा युवा उपसंघटिका दिव्या मांडवकर, मेघा कोल्हटकर, राजापूर शहर युवती अधिकारी गार्गी शिर्के, स्नेहा उगले
शिवसेना स्टाईल आंदोलन करू- रवींद्र डोळस
एसटी हि गरीबांची आहे.ती बंद पडू नये अशी आमची इच्छा आहे. पण समोर जर ती महिला दिसतेय तर तिला तिकिटात सवलत देण्यासाठी कार्डाची सक्ती कशाला करता. कार्ड नाही किंवा कार्डला रिचार्ज नाही म्हणून त्यांची सवलत कशाला बंद करताय. आज आम्ही तुम्हाला शांतपणे विनंती करतोय. एनएमसी कार्ड नसेल तरी पर्यायी व्यवस्था करून प्रवाशांना सवलत द्या. प्रवाशांना त्रास झाला तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करू असा इशारा शिवसेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख रवींद्र डोळस यांनी दिला.
गणेशोत्सवात परतीच्या प्रवासाचे नियोजन करा
गणेशोत्सवात मुंबईहून मोठ्या संख्येने एसटीच्या जादा गाड्या येतात. परतीच्या प्रवासाच्या वेळी रत्नागिरीतून नियोजनात ढिसाळपणा आढळून येतो. अपेक्षित गाड्यांचे नियोजन न केल्यामुळे प्रवाशांना त्रास होतो तो टाळा. गणेशोत्सवात स्थानिक गाड्या रद्द करून दररोज प्रवास करणाऱ्यांची गैरसोय करू नका अशी मागणी जिल्हाप्रमुख दत्ता कदम यांनी केली.
Comments are closed.