चिपळूणचा उड्डाणपूल गणेशोत्सवा पूर्वी वाहतुकीला खुला होणं अशक्य, सर्व्हिस रोडच्या डागडुजीवर भर
गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावरील चिपळूणच्या बहुचर्चित उड्डाणपुलावरून हलकी वाहतूक सुरू करण्याचे स्वप्न सध्या हवेतच विरले आहे. उड्डाणपुलाची एक लेन गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीसाठी खुली करण्याचा प्रशासनाचा विचार होता. मात्र प्रत्यक्ष कामाची सद्यस्थिती पाहाता हा पर्याय व्यवहार्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
उड्डाणपुलावरील भरावाचे मोठे काम अद्याप बाकी असल्याने प्रशासनाने आता पर्यायी मार्ग असलेल्या सर्व्हिस रोडच्या दुरुस्तीवर लक्ष केंद्रित केले आहे. गुरुवारी बहादूरशेख नाका ते वाशिष्ठी पुलाच्या दोन्ही बाजूंच्या सर्व्हिस रोडवर डांबराचे पट्टे मारून खड्डे बुजविण्याचे काम करण्यात आले. बहादूरशेख नाका ते पंचायत समितीदरम्यानच्या सर्व्हिस रोडच्या साईड पट्ट्या वाढविण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, गुरुकुल कॉलेजजवळ वाहतुकीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गतिरोधकही टाकण्यात आला आहे.
उड्डाणपूल पूर्णत्वास जाण्यास आणखी वेळ लागणार असला तरी गणेशोत्सवातील संभाव्य वाहतूक कोंडीचा प्रश्न प्रशासनासमोर आहे. त्यामुळे सध्या सर्व्हिस रोडची डागडुजी, खड्डे बुजविणे, साईड पट्ट्या मजबूत करणे, आवश्यक ठिकाणी गतिरोधक उभारणे आदी तातडीच्या उपाययोजनांना वेग देण्यात आला आहे.गणेशभक्तांना प्रवासात कमीतकमी अडथळे यावेत आणि चिपळूण शहरातून वाहतूक सुरळीतपणे मार्गस्थ व्हावी, यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू असल्याचे चित्र आहे. उड्डाणपूल कधी पूर्ण होणार आणि त्यावरून वाहतूक कधी सुरू होणार, हा प्रश्न अद्याप कायम असला तरी गणेशोत्सवातील वाहतुकीचा वाढता ताण लक्षात घेता सर्व्हिस रोडची केलेली तातडीची डागडुजी वाहनचालकांसाठी काहीसा दिलासा देणारी ठरणार आहे.
उड्डाणपुलाचे काम मात्र अद्याप बाकी
चिपळूणमधील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उड्डाणपुलाची एक लेन गणेशोत्सवापूर्वी सुरू करण्याचा विचार प्रशासनाकडून करण्यात आला होता. मात्र, उड्डाणपुलावर अद्याप मोठ्या प्रमाणात भरावाचे काम बाकी आहे. त्यामुळे घाईघाईने एक लेन वाहतुकीसाठी खुली करणे व्यवहार्य नसल्याचे स्पष्ट झाले आहे. परिणामी, यंदाच्या गणेशोत्सवात उड्डाणपुलाचा पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता कमी झाली आहे.
Comments are closed.