रघुवीर घाटात पुन्हा दरड कोसळली, सातारा जिल्ह्यातील 20 ते 22 गावांचा रत्नागिरीशी संपर्क तुटला
रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रघुवीर घाटात गुरुवारी रात्री पुन्हा एकदा मोठी दरड कोसळली. रस्त्यावर माती व मोठमोठे दगड आल्याने घाटातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. यामुळे सातारा जिल्ह्यातील सुमारे 20 ते 22 गावांचा रत्नागिरी जिल्ह्याशी संपर्क तुटला आहे.
रघुवीर घाटात वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडत असल्याने या मार्गावरील प्रवास धोकादायक बनला आहे. गुरुवारी रात्री मोठ्या प्रमाणात दरड कोसळून दगड-माती थेट रस्त्यावर आल्याने दोन्ही बाजूची वाहतूक बंद झाली. दरड कोसळल्यानंतर रस्त्यावर मोठे दगड आणि मातीचा ढिगारा खाली पडला. त्यामुळे वाहनांना मार्ग काढणे अशक्य झाले असून, वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
दरड कोसळण्याची घटना घडताच प्रशासनाने परिस्थितीची पाहणी करून रस्ता मोकळा करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. घाटातील भौगोलिक परिस्थिती, उंच कडे आणि सतत कोसळणाऱ्या दरडी यामुळे दरड हटविण्याचे कामही आव्हानात्मक ठरत आहे.या मार्गावरील बससेवाही ठप्प झाली असून, त्याचा थेट परिणाम स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. रत्नागिरीकडे ये-जा करणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे.
दरड कोसळल्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाच्या वतीने रस्त्यावर आलेले मोठमोठे दगड आणि माती हटविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मार्ग शक्य तितक्या लवकर वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी यंत्रसामग्रीच्या मदतीने प्रयत्न केले जात आहेत. रस्ता मोकळा झाल्यानंतर या मार्गावरील वाहतूक तसेच बससेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत.
Comments are closed.