गोरेगावच्या नूतन विद्यामंदिरचा थाय बॉक्सिंगमध्ये दणका; राष्ट्रीय स्पर्धेत एका सुवर्णासह तीन रौप्य, दोन कांस्यपदकांची कमाई
इंदिरा गांधी कृषी युनिव्हर्सिटीमध्ये रंगलेल्या आठव्या राष्ट्रीयस्तरीय थाय बॉक्सिंग स्पर्धेत गोरेगावच्या नूतन विद्यामंदिर महाराष्ट्र विद्यालयाच्या खेळाडूंनी दमदार कामगिरी करत महाराष्ट्राची मान उंचावली. मुंबई विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱया या शाळेच्या खेळाडूंनी तब्बल सहा पदकांवर मोहोर उमटवली. विद्यालयाच्या नितीन लांबोरेने सुवर्णपदक, तर मानसी निवाते, दीक्षा नाईक आणि युवराज चव्हाण यांनी रौप्यपदक पटकावले. ऋषिकेश चव्हाण आणि मोहित भोसले यांनी कांस्यपदक जिंकत संघाला पदकांचा षटकार ठोकून दिला.
विद्यामंदिराच्या या घवघवीत यशाबद्दल सर्व खेळाडूंचे तसेच शाळेचे सचिव अनिल देसाई, मुख्याध्यापक मसुरकर, मुख्याध्यापिका दीपाली राऊत, प्रिन्सिपल पूर्वा नाईक आणि प्रशिक्षक गौरव पांचाळ यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments are closed.