दुलीप ट्रॉफीच्या फायनलमध्ये ईशान किशनचं त्रिशतक थोडक्यात हुकलं! अनेक मोठे विक्रम केले प्रस्थापित

सध्या दुलीप ट्रॉफी 2026 स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. या अंतिम सामन्यात दक्षिण विभागाविरुद्ध पूर्व (East Zone vs South Zone) विभागाचा कर्णधार ईशान किशनने (Ishaan kishan) द्विशतक झळकावले. मात्र, त्याची एक इच्छा अपूर्ण राहिली. तो त्रिशतकाच्या अगदी जवळ पोहोचला होता, पण केवळ 30 धावांनी त्याचे त्रिशतक हुकले. असे असले तरी त्याने या खेळीदरम्यान अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
ईशान किशन यावेळी दुलीप ट्रॉफीमध्ये पूर्व विभागाचे (East Zone) कर्णधारपदही सांभाळत आहे. त्याच्या संघाने शानदार कामगिरी करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली असून, आता विजेतेपदापासून ते केवळ एक पाऊल दूर आहेत. अंतिम सामन्याच्या पहिल्या दोन दिवसांत कर्णधार ईशान किशनने स्वतः दमदार फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारली आहे.
दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात द्विशतक झळकावणारा तो पहिला यष्टीरक्षक-कर्णधार ठरला आहे. तसेच, दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात द्विशतक झळकावणारा तो केवळ सातवा फलंदाज ठरला आहे. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 4 हजार धावा पूर्ण करत त्याने दहावे शतक झळकावले आहे.
त्याचबरोबर ईशान किशनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये आपल्या 4 हजार धावाही पूर्ण केल्या आहेत. विशेष म्हणजे, त्याने या दोन्ही कामगिरी एकाच डावात साध्य केल्या आहेत. यापूर्वी त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या अंतिम सामन्यातही शतक झळकावले होते. त्यावेळी त्याने अवघ्या 49 चेंडूंमध्ये 101 धावांची तुफानी खेळी केली होती.
दुलीप ट्रॉफीच्या या अंतिम सामन्यात ईशानने 334 चेंडूंचा सामना करत तब्बल 270 धावांची शानदार खेळी केली. तो केवळ 30 धावांनी त्रिशतक पूर्ण करण्यापासून दूर राहिला. आपल्या या खेळीत त्याने 30 चौकार आणि 7 षटकार ठोकले. जर त्याने आणखी 30 धावा केल्या असत्या, तर या स्पर्धेत त्रिशतक झळकावणारा तो केवळ तिसरा फलंदाज ठरला असता. यापूर्वी रमन लांबा आणि गगन खोडा यांनीच दुलीप ट्रॉफीमध्ये त्रिशतक झळकावले आहे. ईशान या यादीत स्थान मिळवण्याच्या अगदी जवळ पोहोचला होता; मात्र त्यापूर्वीच बाद झाल्याने त्याला माघारी परतावे लागले.
दरम्यान, अंतिम सामन्यात आतापर्यंत दोन दिवसांचा खेळ पूर्ण झाला असून, दोन्ही दिवशी पूर्व विभागानेच फलंदाजी केली. पूर्व विभागाचा डाव संपताच त्या दिवसाचा खेळही संपला. संघाने तब्बल 163 षटके फलंदाजी करताना 708 धावांची मोठी धावसंख्या उभारली.
ईशान किशनने 270 धावा केल्या, तर कुमार कुशाग्रनेही 101 धावांची चांगली खेळी केली. आता सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण विभागाचा (West Zone) फलंदाजीचा डाव सुरू होईल. एवढ्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग दक्षिण विभागाचा संघ कशाप्रकारे करतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Comments are closed.