भारतीय आणि चिनी अधिकाऱ्यांमध्ये चर्चा
सीमेसंबंधी विवाद्य मुद्यांवर सविस्तर वाटाघाटी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि चीन यांच्यात अरुणाचल प्रदेशात प्रथम कोअर कमांडर पातळीवरची चर्चा झाली आहे. ही चर्चा रविवारी रात्री उशीरा वाचा-दमाई सीमेवरील बैठक स्थळी झाल्याची माहिती देण्यात आली आहे. या चर्चेत भारताच्या प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व तिसऱ्या कोअर कमांडचे लेफ्टनंट जनरल गिरीश कालिया यांनी केले. तर चीनच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व कालिया यांचे समकक्ष असणारे सैनिकी अधिकाऱ्यांनी केले, अशी माहिती सोमवारी प्रसिद्धीस देण्यात आली आहे.
दोन्ही शिष्टमंडळांच्या भेटीत भारत-चीन सीमावादाच्या संदर्भातील मुद्द्यांवर भर देण्यात आला. विवाद सोडविण्यासाठी काय करता येईल, यावर दोन्ही बाजूंनी विचारविनिमय केला. भारतीय सेनेच्या पूर्व विभागात या स्तरावरील ही प्रथम बैठक होती. या चर्चेचे स्थळ हे भारताच्या कार्यकक्षेत येणारे होते. ही बाबही महत्वाची मानण्यात येत आहे. हे क्षेत्र भारत आणि चीन यांच्या पूर्वसीमावादातील एक अतिसंवेदनशील क्षेत्र मानले जाते. या चर्चेमुळे दोन्ही देशांमध्ये सामंजस्य निर्माण होण्यासाठी एक नवे सैनिक माध्यम निर्माण झाले आहे. या माध्यमामुळे सीमावादासंबंधीच्या स्थानिक समस्या, तसेच सीमेसंबंधी दोन्ही देशांच्या ज्या धारणा आहेत, त्यांच्यातील विसंगतीमुळे निर्माण होणाऱ्या समस्या, यांच्यावर भविष्यकाळातही चर्चा होण्याची संधी उत्पन्न झाली आहे. भविष्यकाळात सीमावादावरुन निर्माण होऊ शकणारे संघर्ष कसे नियंत्रित करायचे, याविषयीच्या मुद्द्यांवरही विचारविमर्श झाला आहे, अशी माहिती दोन्ही देशांनी दिली आहे.
मोठ्या प्रमाणात सैनिकांची नियुक्ती
मधल्या काळात चीनने सीमेच्या विद्यमान स्वरुपात परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी त्या देशाने या भागात मोठ्या प्रमाणात सैनिकी तुकड्यांची नियुक्ती केली होती. त्यामुळे भारतानेही येथे आपल्या सैनिकांची संख्या वाढविली असून चीनच्या तोडीस तोड सज्जता केली आहे. पर्वतीय क्षेत्रात युद्ध करण्यासाठी ज्या सज्जतेची आवश्यकता असते, तशा प्रकारची सज्जता भारताने केलेली आहे.
दोन प्रमुख कोअर तुकड्यांवर उत्तरादायित्व
अरुणाचल प्रदेश आणि या भागातील चीनला लागून असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या संरक्षणाचे उत्तरदायित्व भारताने दोन प्रमुख कोअर तुकड्यांवर सोपविली आहे. तेजपूर येथे स्थित असणारी चौथी कोअर तुकडी आणि रंगापहार स्थित तिसरी कोअर तुकडी या त्या दोन तुकड्या आहेत. या क्षेत्रात चीनची सेना सातत्याने पुढे येण्याचा प्रयत्न करीत असते. तथापि, चीनच्या या आक्रमकपणाला रोखण्यासाठी भारतीय सैनिक तुकड्यांनीही तोडीस तोड भूमिका स्वीकारली आहे.
सीमासंरक्षणाशी तडजोड नाही
कोणत्याही परिस्थितीत चीनी सेनेला प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून भारताच्या कार्यक्षेत्रात प्रवेश करु दिला जाणार नाही, असा निर्धार भारताच्या सेनेने केलेला दिसून येत आहे. सीमासुरक्षेच्या संदर्भात कोणतीही तडजोड करायची नाही, हे भारताच्या सेनेने धोरण आहे. या धोरणाला अनुसरुनच चीनशी चर्चा केली जात आहे. चीनशी चर्चा याचा अर्थ भारताची कमजोरी असा नाही, हे स्पष्ट आहे.
गलवान संघर्षानंतर अधिक सावधपणा
2020 मध्ये लडाख भागातील गलवान येथे भारत आणि चीन यांच्या सैनिकांमध्ये रक्तरंजित संघर्ष झाला होता. त्यात दोन्ही बाजूंचे सैनिक मारले गेले होते. तेव्हापासून भारताने अधिक सज्जता लडाख तसेच अरुणाचल प्रदेश सीमेवर केली आहे. लडाख सीमेवर मोठ्या प्रमाणात सैनिक तुकड्या आणण्यात आल्या आहेत. तसेच अरुणाचल प्रदेशातही मोठ्या प्रमाणात सज्जता आहे. काही दिवसांपूर्वी भारताचे भूसेना प्रमुख धीरज सेठ यांनी अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती भागाची व्यापक पाहणी केली आणि सैनिकांच्या सज्जतेचा आढावा घेतला आहे.
चर्चेसमवेत सज्जताही…
ड चीनशी चर्चा करतानाही भारताकडून सीमासुरक्षेसंबंधी सडेतोड सज्जता
ड रविवारी रात्री झालेल्या चर्चेत सीमेसंबंधीच्या विवाद्य मुद्द्यांवर होता भर
ड लडाख आणि अरुणाचल प्रदेश सीमांवर सैनिक तुकड्यांमध्ये केली वाढ
Comments are closed.