मध्य प्रदेशात स्पिरिट आणि अवैध दारू जप्त.
तब्बल 50 लाखांचा मुद्देमाल हस्तगत
वृत्तसंस्था/ भोपाळ
मध्यप्रदेशात सागर येथील विषारी दारूच्या दुर्घटनेनंतर, उत्पादन शुल्क विभागाने ग्वाल्हेरमध्ये एक मोठी धाड टाकली. या छाप्यात 12 प्लास्टिक ड्रममध्ये भरलेले अंदाजे 2,300 लिटर स्पिरिट जप्त करण्यात आले. याठिकाणी किंगफिशर, लेमोंट बोल्ट आणि पॉवर ब्रँडच्या बिअरसोबतच देशी आणि साधी दारूही जप्त करण्यात आली. एकूण 61.32 लिटर देशी आणि विदेशी दारू जप्त करण्यात आल्याचे उत्पादन शुल्क विभागाने सांगितले. जप्त करण्यात आलेला मुद्देमाल 50 लाख रुपयांचा असल्याची माहिती तपास यंत्रणांकडून देण्यात आली.
मध्यप्रदेशमधील उत्पादन शुल्क पथकाने ग्वाल्हेर-शिवपुरी महामार्गावरील महाकाल पंडित ढाब्यावरून अंदाजे 2,300 लिटर स्पिरिट जप्त केले. प्राथमिक तपासणीत ही स्पिरिट मानवी सेवनासाठी अयोग्य असल्याचे आढळून आले आहे. जिल्हाधिकारी रुचिका चौहान यांच्या निर्देशानुसार उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध दारूचे उत्पादन, विक्री, साठवणूक आणि वाहतूक याविरोधात एक विशेष मोहीम सुरू झाली असताना ही कारवाई करण्यात आली आहे. एका खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे उत्पादन शुल्क पथकाने ढाब्यावर छापा टाकत जप्तीची कारवाई केली.
आरोपींना घटनास्थळी अटक
जप्तीच्या कारवाईदरम्यान मोहना येथील रहिवासी अनिल शर्मा, कराहल श्योपूर येथील रहिवासी सौरभ गुर्जर आणि मोहना येथील रहिवासी अरवाझ खान यांना घटनास्थळी अटक करण्यात आली. मध्य प्रदेश उत्पादन शुल्क कायदा, 1915 च्या कलम 34(1), 34(2) आणि 49-अ अंतर्गत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून जप्त केलेल्या स्पिरिटचा वापर भेसळ करण्यासाठी केला जात होता. घटनास्थळावरून ड्रममध्ये भरलेले मोठ्या प्रमाणात पेट्रोल आणि थिनर देखील जप्त करण्यात आले. पुढील कारवाईसाठी पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली आहे.
32 लाख रुपये किमतीचे स्पिरिट
जप्त केलेल्या 2,300 लिटर स्पिरिटचा वापर अंदाजे 32 लाख रुपये किमतीची अवैध आणि निकृष्ट दर्जाची दारू तयार करण्यासाठी केला जाऊ शकला असता. जप्त केलेल्या स्पिरिट, दारू आणि इतर साहित्याचे एकूण मूल्य अंदाजे 50 लाख रुपये असल्याचा अंदाज आहे. आता अवैध आणि विषारी दारूविरोधातील मोहीम सुरूच राहील, असे उत्पादन शुल्क विभागाने स्पष्ट केले आहे.
Comments are closed.