Ganpati decoration: बाप्पाच्या मखरासाठी खास इको-फ्रेंडली सजावट

गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच घराघरांत लगबग सुरू होते. कुठे बाप्पाच्या आगमनाची तयारी, कुठे मोदकांची तयारी, तर कुठे मखर आणि सजावटीसाठी भन्नाट आयडिया शोधल्या जातात. विशेष म्हणजे, छोट्या मंडळींच्या डोक्यात सजावटीच्या हटके कल्पना असतात, तर मोठ्यांना त्या कल्पना प्रत्यक्षात आणण्याची धावपळ असते. यंदा बाजारातील तयार मखराऐवजी थोडी क्रिएटिव्हिटी वापरून इको-फ्रेंडली सजावट केली तर? सजावट सुंदरही दिसेल आणि पर्यावरणाची काळजीही घेता येईल. चला, जाणून घेऊया बाप्पाच्या मखरासाठी काही हटके आणि सोप्या आयडिया.

1) फुलांची सजावट
झेंडू, शेवंती, गुलाब यांसारख्या फुलांचा वापर करून बाप्पाच्या मखराभोवती सुंदर तोरण किंवा फुलांची कमान तयार करा. फुलांच्या पाकळ्यांची रांगोळीही मखराची शोभा वाढवू शकते.

2) कागदाची सजावट
रंगीत किंवा जुन्या कागदापासून फुलं, पताका, तोरण आणि वेगवेगळ्या आकारांच्या कलाकृती तयार करता येतात. घरच्या घरी तयार केलेली ही सजावट बाप्पाच्या मखराला वेगळा लूक देईल.

3) साडी / दुपट्ट्याचा वापर
घरातील आकर्षक साडी किंवा दुपट्टा मखराच्या मागे बॅकड्रॉप म्हणून वापरता येतो. त्यावर फुलांची माळ किंवा छोट्या दिव्यांची सजावट केल्यास साधं मखरही सुंदर दिसतं.

4) नैसर्गिक वस्तू
बांबू, नारळाच्या झावळ्या, लाकडी वस्तू, पाने किंवा वाळलेल्या फुलांचा वापर करून मखर सजवता येईल. नैसर्गिक वस्तूंमुळे सजावटीला पारंपरिक आणि प्रसन्न लुक मिळतो.

5) रोपांची सजावट
बाप्पाच्या मखराच्या आजूबाजूला छोटी हिरवीगार रोपं ठेवा. मनी प्लांट, तुळस किंवा घरातील इतर कुंडीतील रोपांमुळे सजावटीला नैसर्गिक आणि ताजातवाना लुक मिळेल.

6) शाडू मातीची मूर्ती
इको-फ्रेंडली गणेशोत्सवासाठी शक्य असल्यास शाडू मातीची मूर्ती निवडण्याचा पर्याय विचारात घेता येतो. मूर्ती निवडताना रंग आणि सजावटीसाठी वापरलेले साहित्यही पर्यावरणपूरक आहे का, याकडे लक्ष द्या.

बाप्पाच्या सजावटीसाठी नेहमी महागड्या वस्तूंची गरज नसते. घरात उपलब्ध असलेल्या वस्तूंचा कल्पक वापर करून साधी, सुंदर आणि पर्यावरणपूरक सजावट करता येते.

Comments are closed.