Asia Cup 2026 – बांगलादेशचा धुव्वा उडवत हिंदुस्थानच्या रणरागिणी सलग 10 व्यांदा अंतिम फेरीत
हिंदुस्थान आणि बांगलादेश यांच्यामध्ये दुबई येथे Asia Cup 2026 ची पहिली सेमी फायनल खेळली गेली. या सामन्यात हिंदुस्थानने धडाकेबाज कामगिरी करत बांगलादेशचा 40 धावांनी धुव्वा उडवला आहे. या विजयासह हिंदुस्थानच्या रणरागिणींनी सलग 10 व्यांदा अंतिम फेरीत धडक मारली आहे.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हिंदुस्थानने 20 षटकांत 5 बाद 149 धावांचे आव्हान उभारले होते, ज्यामध्ये सलामीवीर शैफाली वर्माने मिळालेल्या तीन जीवनदानांचा फायदा उठवत 7 चौकार व 3 षटकारांसह 64 धावांची खेळी केली, तर ऋचा घोष (21) आणि कर्णधार हरमनप्रीत कौरने (नाबाद 24) मोलाचे योगदान दिले. प्रत्युत्तरात दीप्ती शर्माच्या (3 बळी) भेदक गोलंदाजीसमोर बांगलादेशचा संघ 20 षटकांत 7 बाद 109 धावांपर्यंतच मजल मारू शकला. 2004 मधील पहिल्या आवृत्तीपासून प्रत्येक वेळी फायनल गाठणाऱ्या हिंदुस्थानचा या स्पर्धेतील हा सलग चौथा विजय असून, आता पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेत्याविरुद्ध 8 व्यांदा आशिया चषक जिंकण्याच्या इराद्याने हिंदुस्तानी संघ मैदानात उतरेल.
Comments are closed.