गिरगावातील दुर्गादेवी शाळा वाचवण्यासाठी शिवसेनेचा लढा, आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात जनआंदोलन
गिरगाव येथील दुर्गादेवी महापालिका शाळेचे खासगीकरण करण्याचा डाव आहे. ही शाळा ‘पीपीपी’ तत्त्वावर पुनर्विकासासाठी कानपूर येथील संस्थेला देण्यात येत आहे. याविरोधात स्थानिकांमध्ये तीव्र संताप असून पालिकेच्या मालकीची दुर्गादेवी शाळा वाचवण्यासाठी शिवसेनेने लढा सुरू केला आहे. शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आज जनआंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो गिरगावकर उतरले. दुर्गादेवी शाळा महानगरपालिकेची राहिली नाही तर इतर कोणत्याही संस्थेला इथे एक वीटदेखील रचू देणार नाही, असा इशारा यावेळी आदित्य ठाकरे यांनी पालिका प्रशासनाला दिला.
कुंभारवाडा, वॉर्ड क्रमांक 220 मधील दुर्गादेवी शाळेचा भूखंड कानपूर येथील वीरेंद्र स्वरूप मेमोरियल ट्रस्ट या संस्थेला देण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. स्थानिकांचा विरोध डावलून ही प्रक्रिया पुढे रेटण्यात येत आहे. याविरोधात आज आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली जनआंदोलन झाले. पालिकेच्या मालकीची शाळा वाचवण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. यावेळी जनआंदोलनाची दिशा स्पष्ट करताना आदित्य ठाकरे म्हणाले, दुर्गादेवी शाळा वाचवण्यासाठी आज आपण शांततेत छोटीसी सुरुवात स्वाक्षरी मोहिमेने करत आहोत. सह्या घेऊन सांगत आहोत की, या शाळेला हात लावू नका. शाळेसंदर्भात समित्या गठन करणे वगैरे सोडून द्या, पण ही शाळा महानगरपालिकेची राहिली नाही तर इथे एक वीटदेखील आम्ही लागू देणार नाही. तुमचे जे पत्रे या भूखंडावर लागले आहेत ते फेकून देऊ, पण ही जागा प्रायव्हेट ट्रस्टच्या हाती जाऊ देणार नाही. तुम्हाला पंधरा दिवस देतोय. गणपतीनंतर अजून तीव्र आंदोलन करू.
आदित्य ठाकरे यांनी भाजपच्या बिल्डरधार्जिण्या धोरणाचा चांगलाच समाचार घेतला. आदित्य ठाकरे म्हणाले, आम्ही महापौरांना थेट इशारा देतोय की स्वार्थ बाजूला ठेवा. भाजपच्या मालकांना आम्ही मुंबई विकू देणार नाही. तुम्ही तुमच्या मालकांची सेवा करा, आम्ही आमच्या मुंबईची सेवा करतोय. भाजपचे जे मालक आहेत, जे बिल्डर आहेत त्यांना भाजप सगळे काही विकायला निघाली आहे. कानपूरची खासगी संस्था जर शाळेच्या जागी काम करायला लागली तर आपण आत घुसून त्या संस्थेला हद्दपार करायचे. ही शाळा महानगरपालिकेचीच राहिली पाहिजे. विद्यार्थी मुंबई मनपाच्या शाळेतच येतील. आज इथे स्वाक्षरी करून ही जिद्द आणि ही मोहीम आणखी घट्ट करूया.
शिवसेना खासदार अरविंद सावंत, महापालिकेच्या विरोधी पक्षनेत्या शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर, उपनेते अरुण दुधवडकर आणि राजकुमार बाफना, विभागप्रमुख संतोष शिंदे, महिला विभाग संघटक युगंधरा साळेकर, स्थानिक नगरसेविका संपदा मयेकर, उपविभागप्रमुख सुरेंद्र निगुडकर, महिला शाखा संघटक कल्पना भांबुरे, मुंबादेवी विधानसभा संघटक उज्ज्वला पेटकर, शाखाप्रमुख वैभव मयेकर, मनसेचे प्रशांत गांधी, वैभव राऊत, आरती पडवळ यांच्यासह शेकडो शिवसैनिक, युवासैनिकांनी आणि स्थानिक रहिवाशांनी जनआंदोलनात सहभाग घेतला.
मुंबई बिल्डरांच्या हाती देण्याचा डाव
भाजप सरकारने मोठमोठे भूखंड बिल्डरांच्या हाती द्यायला सुरुवात केलीय. नुकतेच शिवसेनेने वांद्रे येथील नेव्हल डिसोझा फुटबॉल मैदान वाचवण्यासाठी आंदोलन केले. या सरकारने अंधेरी येथील तीन भूखंड घेतले. मुलुंडचा भूखंड पेट्रोल पंपाला द्यायचा घाट घातला. हा काय स्वार्थ आहे? मुंबई अदानीला विकायची, नाहीतर बिल्डरला द्यायची. भाजपला मुंबई जिंकायची होती. कारण ती मुंबईकरांच्या हातून खेचून बिल्डरच्या हाती देण्यासाठी… पण हे आपण होऊ द्यायचे नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
मुंबईकरांचा आवाज दाखवून देऊ
भाजपच्या राजवटीत महापौर, नगरसेवक स्वतःवर खर्च करत आहेत. कधी महापौर बंगल्यासाठी, कधी आलिशान गाडय़ांसाठी खर्च, तर कधी उपमहापौरांची स्वतःसाठी बंगल्याची मागणी, नगरसेवकांसाठी टॅब असे सर्व प्रकार सुरू आहेत. आम्ही टॅब वाटले ते पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना! आपण मुंबई आणि मुंबईकरांच्या सोयीसुविधांसाठी करत होतो आणि करत राहू. पालिकेच्या सभागृहात बोलू दिले जात नाही म्हणून शिवसेनेने प्रतिसभागृह घेतले. जर आपल्याला आत बोलू दिले जात नाही तर बाहेर आवाज निघेल आणि तो आवाज शिवसेनेचा असेल. हा आवाज मुंबईकरांचा असेल, जो आज आपण इथे दाखवून देत आहोत, असे आदित्य ठाकरे यांनी ठणकावले.
Comments are closed.