मी जीवन संपवतोय… ‘नवरा माझा नवसाचा’ फेम अभिनेत्याची खळबळजनक पोस्ट, पोलिसांनी वेगाने चक्र फिरवली अन्…
मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते विकास समुद्रे यांच्या एका फेसबुक पोस्टमुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. विकास समुद्रे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून “I am committing Suicide” (मी जीवन संपवत आहे) अशी पोस्ट केली होती. ही पोस्ट पाहताच चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. तसेच मुंबई पोलीस दल तात्काळ सतर्क झाले.
अभिनेत्याची ही पोस्ट वाऱ्यासारखी पसरल्यानंतर सायबर विभागाचे पोलीस उपायुक्त बजरंग बनसोडे आणि मुंबई पोलिसांनी त्वरित पावले उचलत विकास समुद्रे यांच्याशी संपर्क साधला. पोलिसांनी अभिनेत्याचा शोध घेऊन त्यांच्या सुरक्षेची खात्री केली.
टायपिंग मिस्टेकमुळे उडाला गोंधळ
पोलीस तपासादरम्यान एक मोठी बाब समोर आली. अभिनेत्याचा जीवन संपवण्याचा कोणताही विचार नव्हता. फेसबुकवर पोस्ट अपलोड करताना त्यांच्याकडून टायपिंगची चूक झाली होती. या चुकीमुळे भलताच अर्थ निघाल्याने सर्वत्र गैरसमज पसरला. सध्या विकास समुद्रे पूर्णपणे सुरक्षित आणि सुखरूप आहेत.
कमेंट्स सेक्शनमध्ये काळजीचा पाऊस
पोस्ट समोर आल्यानंतर चाहत्यांनी कमेंट्स करून अभिनेत्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. “काही अडचण असेल तर नक्की मार्ग काढू, पण असं टोकाचं पाऊल उचलू नका,” अशा अनेक विनंत्या चाहत्यांकडून केल्या जात होत्या.

अभिनेत्याची कारकीर्द
‘नवरा माझा नवसाचा’ या लोकप्रिय चित्रपटातील विनोदी भूमिकेमुळे विकास समुद्रे घराघरांत पोहोचले. त्यांनी अनेक नाटकांमध्येही उत्कृष्ट काम केले आहे. काही दिवसांपूर्वीच एका पॉडकास्टमध्ये त्यांनी त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंगाचा उल्लेख केला होता. काही वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन हॅमरेज झाले होते, त्या कठीण काळातून सावरून त्यांनी पुन्हा कलाक्षेत्रात पुनरागमन केले आहे.
Comments are closed.