कोरियाचा धुव्वा उडवत हिंदुस्थान फायनलमध्ये
गतविजेत्या हिंदुस्थानी ज्युनियर महिला हॉकी संघाने आपला विजयी धडाका कायम ठेवत एएचएफ ज्युनियर महिला आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत दिमाखात प्रवेश केला. उपांत्य सामन्यात हिंदुस्थानने दक्षिण कोरियाचा तब्बल 5-1 असा फडशा पाडला. ड्रग फ्लिकर सुप्रियाने पेनल्टी कॉर्नरवर तीन गोल ठोकत हॅट्ट्रिक साजरी केली आणि कोरियाच्या बचावफळीची अक्षरशः दाणादाण उडविली.
आज दोन्ही संघांनी लढतीची सावध सुरुवात केली. मात्र, 13व्या मिनिटाला मधू सिदरने भन्नाट मैदानी गोल करत हिंदुस्थानचे खाते उघडले. त्यानंतर हिंदुस्थानी आक्रमणाने वेग पकडला. 17व्या मिनिटाला सुप्रियाने अचूक फटका लगावत हिंदुस्थानची आघाडी 2-0 केली. हिंदुस्थानने चेंडूवरील वर्चस्व कायम ठेवत कोरियाला बचावाच्या कचाटय़ात पकडले. 21व्या मिनिटाला सुखवीरने तिसरा गोल डागला.
33व्या मिनिटाला मिळालेला पेनल्टी
कॉर्नर सुप्रियाने पुन्हा गोलमध्ये बदलला आणि हिंदुस्थानला 4-0 असा आघाडीवर गेला. 41व्या मिनिटाला युरी जियोंगने पेनल्टी कॉर्नरवर कोरियाचा एकमेव गोल केला. सामना संपण्यास चार मिनिटे बाकी असताना 56व्या मिनिटाला सुप्रियाने आणखी एक पेनल्टी कॉर्नर गोलमध्ये बदलत आपली हॅट्ट्रिक पूर्ण केली आणि हिंदुस्थानच्या 5-1 विजयावर शिक्कामोर्तब केले.
Comments are closed.