सचिन तेंडुलकरला आपल्या कारकिर्दीत जे जमलं नाही ते जो रूटने चारवेळा केले! जाणून घ्या भन्नाट रेकॉर्ड

इंग्लंड कसोटी संघाचा कर्णधार जो रूट एकामागोमाग एक दिग्गज सचिन तेंडुलकरचे विक्रम मोडत चालला आहे. आता त्याने भारताच्या माजी खेळाडूना न जमलेल्या विक्रमाचा चौकार मारला आहे. रूटने पाकिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात नाबाद ६२ धावांची खेळी केली. त्याच्या या धमाकेदार खेळीने इंग्लंड जिंकला आणि रूटचा रिकी पॉंटींग आणि जॅक कॅलिस यांच्या खास यादीत प्रवेश झाला.

एजबस्टनमध्ये इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान तिसरा कसोटी सामना खेळला गेला, जो यजमान संघाने ८ विकेट्सने जिंकला. याच सामन्यादरम्यान रूटने विक्रमी १००० धावांचा टप्पा ओलांडला. तो एजबस्टनमध्ये १००० कसोटी धावा करणारा पहिला खेळाडू ठरला. याबरोबरच तो चार वेगवेगळ्या मैदानांवर १००० कसोटी धावा करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे.

एजबस्टनच्या आधी रूटने लॉर्ड्स, ओल्ड ट्रॅफर्ड आणि द ओव्हल येथे १००० कसोटी धावा केल्या आहेत. यावरून त्याच्या या घरच्या मैदानांवर रूटची कामगिरी उल्लेखनीय झालेली दिसते. यापैकी त्याने क्रिकेटची मक्का म्हटल्या जाणाऱ्या मैदानावर अधिक धावा केल्या आहेत. त्याने लॉर्ड्सवर २२०३ धावा केल्या आहेत. तसेच त्याने ओल्ड ट्रॅफर्डवर ११२८ आणि द ओव्हलवर १०५० धावा केल्या आहेत.

आता रूटने एजबस्टनवरही १००० कसोटी धावांचा टप्पा पार केला. येथे त्याच्या नावावर १०१८ कसोटी धावा आहेत. रूटच्या आधी अशी कामगिरी केवळ दोन दिग्गजांनाच करता आली आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये चार वेगवेगळ्या मैदानांवर १००० धावांचा टप्पा गाठण्याची कामगिरी दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज अष्टपैलू कॅलिस आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार पॉटिंगने केला आहे.

कॅलिसने केप टाउन (२१८१), सेंचुरियन (१२६७), डर्बन (१२६६) आणि जोहान्सबर्ग (११४८) येथे कसोटीमध्ये १००० धावांचा टप्पा गाठला आहे. पॉटिंगने ऍडलेड (१७४३), सिडनी (१४८०), मेलबर्न (१३३८) आणि ब्रिस्बेन (१३३५) येथे कसोटीमध्ये १००० धावांचा टप्पा गाठला आहे.

सचिनची कामगिरी पाहिली तर त्याने सर्वाधिक कसोटी सामने खेळताना सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक शतके केली आहेत, मात्र त्याला एकाही मैदानावर १००० धावांचा टप्पा गाठता आला नाही. त्याची ९७० ही सर्वोच्च धावसंख्या आहे, जी त्याने चेन्नईच्या एमए चिंदबरम स्टेडियमवर केली आहे. याच आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की एकाच मैदानावर १००० कसोटी धावा करणे किती कठीण आहे ते.

Comments are closed.