761 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणारा गोलंदाज करणार आयपीएल कोचिंगमध्ये डेब्यू, दिल्ली कैपिटल्सने दिली मोठी जबाबदारी

दिल्ली कॅपिटल्सने २०२७ आयपीएल हंगामासाठी आपल्या कोचिंग टीममध्ये मोठा बदल केला आहे. श्रीलंकेचे माजी वेगवान गोलंदाज चामिंडा वास आणि भारताचे माजी स्पिनर अमित मिश्रा नवे बॉलिंग कोच बनणार आहेत. वास पहिल्यांदाच आयपीएलमध्ये कोचिंग करताना दिसतील. ही संपूर्ण टीम भारताचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या देखरेखीखाली काम करेल, जे टीमचे हेड कोच असतील, तर युवराज सिंह फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळतील.

​चामिंडा वास श्रीलंकेचे सर्वात यशस्वी वेगवान गोलंदाज राहिले आहेत. त्यांनी कसोटीत ३५५, एकदिवसीय (ODI) क्रिकेटमध्ये ४०० आणि T20I मध्ये ६ बळी घेतले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ७६१ बळी घेण्यात ते यशस्वी ठरले होते. आयपीएलच्या सुरुवातीला (२००८ ते २०१० पर्यंत) ते डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळले होते. ५२ वर्षांच्या वास यांच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर कोचिंगचा मोठा अनुभव आहे. त्यांनी प्रामुख्याने श्रीलंकेच्या पुरुष संघाला वेगवेगळ्या प्रसंगी प्रशिक्षण दिले आहे. तथापि, २०२१ मध्ये वेतनावरून झालेल्या वादामुळे त्यांनी अवघ्या दोन दिवसांनंतरच राजीनामा दिला होता. याशिवाय त्यांनी न्यूझीलंड संघाचे सल्लागार म्हणून आपल्या कोचिंग करिअरची सुरुवात केली होती आणि २०१६ च्या टी-२० वर्ल्ड कपमध्ये आयर्लंडच्या संघासोबतही काम केले होते.

​मोठ्या संघांना कोचिंग देण्याव्यतिरिक्त चामिंडा वास यांनी कित्येक वर्षे श्रीलंका क्रिकेट बोर्डासोबत फास्ट बॉलिंग कन्सल्टंट आणि क्रिकेट अकादमीमध्ये मेंटॉर म्हणून काम केले आहे. तिथे युवा वेगवान गोलंदाजांची ओळख पटवणे आणि त्यांना तयार करणे हे त्यांचे मुख्य काम होते. टी-२० आणि फ्रँचायझी क्रिकेटच्या अनुभवाबद्दल बोलायचे झाले, तर त्यांनी २०२४ च्या ‘जिम ॲफ्रो टी-१० लीग’मध्ये NYS लागोस संघाला कोचिंग दिले होते आणि २०२६ च्या लंका प्रीमियर लीग (LPL) मध्ये कँडी रॉयल्स संघाचे हेड कोच राहिले होते.

​अमित मिश्रा सुद्धा आयपीएलमध्ये पहिल्यांदाच कोचच्या भूमिकेत दिसतील. यापूर्वी खेळाडू म्हणून त्यांनी आयपीएलच्या दिल्ली डेअरडेव्हिल्स (आताची दिल्ली कॅपिटल्स), डेक्कन चार्जर्स, सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स या चार संघांसाठी प्रतिनिधित्व केले आहे. ४२ वर्षांच्या मिश्रा यांनी आपला शेवटचा आयपीएल सामना २०२४ मध्ये लखनऊसाठी खेळला होता आणि त्यांनी गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये निवृत्ती घेतली होती. २००८ मध्ये आपल्या पहिल्याच आयपीएल सामन्यात त्यांनी ५ बळी घेतले होते. आयपीएलमध्ये सर्वाधिक (३ वेळा) हॅटट्रिक घेणारे ते गोलंदाज आहेत. २०२२ चा अपवाद वगळता, त्यांनी २००८ ते २०२४ पर्यंत दरवर्षी आयपीएल खेळले आहे. अमित मिश्रा आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत १० व्या क्रमांकावर असून, त्यांनी १६२ सामन्यांमध्ये १७४ बळी मिळवले आहेत.

Comments are closed.