वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाच्या निवडीबाबत मोठी अपडेट! ‘या’ 5 खेळाडूंचे पुनरागमन होणार?

आगामी काळात भारतीय वनडे संघ (Indian cricket team) लवकरच पुन्हा मैदानात उतरणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज (India vs West Indies) यांच्यात 27 सप्टेंबरपासून तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची (Team india) घोषणा 16 सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे.

2027 च्या वनडे विश्वचषकाचा विचार करता, निवडकर्त्यांसमोर मजबूत संघ निवडण्याचे मोठे आव्हान आहे. भारताने गेल्या वर्षभरात अनेक वनडे मालिका गमावल्या आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकांचाही समावेश आहे. त्यामुळे विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका भारतासाठी महत्त्वाची मानली जात आहे. त्याचदरम्यान, वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाच्या निवडीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याचे (Hardik pandya) वनडे संघात पुनरागमन जवळपास निश्चित मानले जात आहे. आयपीएल 2026 नंतर त्याने एकही सामना खेळलेला नाही. मात्र, 20 सप्टेंबरपर्यंत तो मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी फिट होण्याची शक्यता आहे. भारत अ संघाच्या वनडे संघातही त्याची निवड झाली आहे.

दरम्यान, आशियाई क्रीडा स्पर्धांमुळे श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) या मालिकेसाठी उपलब्ध असणार नाही. त्यामुळे त्याच्या जागी ऋतुराज गायकवाडला (Ruturaj Gaikwad) संधी मिळू शकते. तसेच, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि यशस्वी जयस्वाल यांचेही संघात पुनरागमन होण्याची चर्चा आहे. याशिवाय, यष्टिरक्षकाच्या जागेसाठी ऋषभ पंत आणि ध्रुव जुरेल यांच्यात स्पर्धा पाहायला मिळू शकते.

तसेच, रोहित शर्मा, विराट कोहली, कर्णधार शुबमन गिल, केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांनाही चाहत्यांना लवकरच मैदानावर पाहायला मिळणार आहे.

Comments are closed.