आग्र्याच्या साईभक्ताकडून साईचरणी कोट्यवधीचे दान; 54 किलो चांदीचा नंदी, बेस, सोन्याचे शिंग-बिंदी अर्पण

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

श्री गणेश चतुर्थीच्या पवित्र मुहूर्तावर उत्तर प्रदेशातील आग्रा येथील साईभक्ताने श्री साईबाबांच्या चरणी ५४ किलो ६५ ग्रॅम वजनाचा चांदीचा नंदी व बेस, तसेच ९८ ग्रॅम ६०० मिलीग्रॅम सोन्याचे शिंग व बिंदी अर्पण केली.

श्री साईबाबा समाधी मंदिरातील श्रींच्या मूर्तीसमोरील जुन्या नंदीचे विधिवत उत्तरपूजन करण्यात आले. त्यानंतर नव्याने अर्पण करण्यात आलेल्या चांदीच्या नंदीची धार्मिक विधीपूर्वक प्रतिष्ठापना भक्तिमय वातावरणात संपन्न झाली.

आग्रा येथील साईभक्ताने अर्पण केलेल्या चांदीच्या नंदीचे वजन २७ किलो २७ ग्रॅम असून, त्याचे देणगीमूल्य ६० लाख २७ हजार २१ रुपये आहे. नंदीसाठी अर्पण केलेल्या चांदीच्या बेसचे वजन २७ किलो ३८ ग्रॅम असून, त्याचे देणगीमूल्य ६० लाख २९ हजार ४७४ रुपये आहे. नंदी व बेसचे एकूण देणगीमूल्य १ कोटी २० लाख ५६ हजार ४९५ रुपये आहे.

नंदीला धार्मिक व अलंकारिक स्वरूप देण्यासाठी २२ कॅरेट सोन्याचे शिंग व बिंदी अर्पण करण्यात आली. सोन्याच्या शिंगाचे वजन ६९ ग्रॅम ३०० मिलीग्रॅम, तर बिंदीचे वजन २९ ग्रॅम ३०० मिलीग्रॅम आहे. या दोन्ही अलंकारांचे एकूण वजन ९८ ग्रॅम ६०० मिलीग्रॅ म असून, देणगीमूल्य १३ लाख ८५ हजार १३२ रुपये आहे. या देणगीची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.

या साईभक्ताने यापूर्वीही श्री साईबाबांच्या चरणी विविध स्वरूपातील सोन्या-चांदीच्या वस्तू श्रद्धेने अर्पण केल्या आहेत. त्यांच्या विनंतीवरून यावेळीही नाव जाहीर करण्यात आलेले नाही.

अमेरिकेतील भक्ताकडून १८.८४ लाखांची छत्री

श्री गणेश चतुर्थीच्या पवित्र मुहूर्तावर अमेरिका स्थित साईभक्त के. चंद्रशेखर यांनी श्री साईबाबांच्या चरणी सोन्याचा मुलामा दिलेली चांदीची छत्री अर्पण केली. ८ किलो ९३३ ग्रॅम वजनाच्या या छत्रीचे देणगीमूल्य १८ लाख ८४ हजार ८६३ रुपये आहे. ही छत्री समाधी मंदिरातील मूर्तीवर माध्यान्ह आरतीपूर्वी धार्मिक विधीपूर्वक प्रतिष्ठ ापित करण्यात आली. या वेळी गोरक्ष गाडीलकर यांनी साईभक्त के. चंद्रशेखर यांचा सत्कार केला.

Comments are closed.