विहिरीत पडलेला वृद्ध दोन दिवसांनी सुखरूप बाहेर

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्यय तालुक्यातील मिरी येथील गोरख धनवटे यांना आला. दोन दिवसांपूर्वी सरपण आणण्यासाठी घराबाहेर पडलेले धनवटे घराजवळ असलेल्या एका पडक्या घरातील तीन फूट रुंद व 50 फूट खोल विहिरीत पडले होते. दोन दिवसांनंतर त्यांचा संपर्क झाला. त्यानंतर कुटुंबीयांनी परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्यांना सुखरूप बाहेर काढले.

सरपण आणण्यासाठी गेलेले धनवटे घराजवळील पडक्या घरात असलेल्या विहिरीत पडले होते. घरात मोठय़ा प्रमाणात गवत व झाडेझुडपे होती. त्यामध्ये विहीर असल्याचे धनवटे यांच्या लक्षात न आल्याने ते पडले. विहिरीत पडल्यानंतर त्यांनी जोरजोरात आवाज देऊन मदतीसाठी हाक दिली. मात्र, त्यांचा आवाज कोणालाही ऐकू आला नाही. त्यातच त्यांचा मोबाईलही बंद पडल्याने पुढे काय? असा प्रश्न त्यांना पडला.

दुसरीकडे सरपण आणायला गेलेले वडील का आले नाहीत, म्हणून त्यांच्या घरच्यांनी आजूबाजूला व नातेवाईकांकडे शोध घेतला. मात्र, उपयोग झाला नाही. यानंतर सोशल मीडियावरही त्यांनी धनवटे हे बेपत्ता असल्याचे सर्वांना कळवले. त्यांचा शोध घेऊनही ते न सापडल्याने अखेर त्यांच्या कुटुंबाने मिरी पोलीस स्टेशनला हरवले असल्याची तक्रार नोंदवली.

दुसऱया दिवशी बंद पडलेला धनवटे यांचा मोबाईल अचानक सुरू झाला अन् त्यांनी लगेच आपल्या कुटुंबाशी संवाद साधत आपण घराजवळ असलेल्या विहिरीत पडलो असल्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांचे नातेवाईक व गावातील तरुण जमा झाले व त्यांनी घराजवळ असलेल्या विहिरीत शोध घेतला. मात्र, धनवटे सापडले नाहीत. काही तरुणांनी पडक्या घरात जाऊन शोध घेतला असता, त्यांना धनवटे ज्या विहिरीत पडले ती सापडली. त्यानंतर दोरखंडाच्या साहाय्याने धनवटे यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. विहीर केवळ तीन फूट रुंद असल्याने त्यांचे शरीर पूर्ण आखडले होते, तर हातालाही मार लागला होता.

Comments are closed.