“विराट-रोहित संघात असले किंवा नसले, तरी काही फरक…”, भारताच्या 2027 विश्वचषक योजनेबाबत माजी खेळाडूचे वक्तव्य

पुढील वर्षी दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वे येथे पुरुष क्रिकेट संघांची एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळली जाणार आहे. यामध्ये भारताचे अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी खेळले पाहिजे, असे अनेकांना वाटते. ते या स्पर्धेत खेळू नये असे संकेत अनेकदा संघ व्यवस्थापनाने दिले आहेत. दुसरीकडे हे दोघे नेहमी चांगली कामगिरी करत आपली जागा टिकवून आहे, मात्र 1983 च्या विश्वचषक विजेत्या खेळाडूचे वेगळेच मत आहे.

भारताचे माजी क्रिकेटपटू आणि माजी मुख्य प्रशिक्षक संदीप पाटील म्हणतात की, 2027 च्या विश्वचषकात रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळले किंवा नाही, तरीही भारतीय संघाला याबाबत कोणतीही अडचण येऊ नये.

पाटील यांच्या मते, खेळाडूंचा संघात समावेश आणि भारतीय संघाची योजना ही त्यांच्या खेळण्याच्या इच्छेवर, त्यांच्या फिटनेसवर आणि निवड समिती आयसीसी स्पर्धांसाठी कशी योजना आखते, यावर अवलंबून आहे.

पाटिल यांनी स्पोर्ट्सनेक्स्टशी बोलताना म्हटले, “भारताकडे राखीव खेळाडूंची ताकद पाहता, या दोन खेळाडूंची (रोहित आणि विराट) अनुपस्थिती फारशी जाणवणार नाही. तसेच पुढे खेळायचे की निवृत्त व्हायचे हा त्यांचा निर्णय आहे.”

जर एखादा वरिष्ठ खेळाडू निवृत्त होत असेल, तर त्याच्याजागी सक्षम बदली खेळाडूंची योजना आखण्याची जबाबदारी निवड समितीची असते. त्या योजनेची त्यांनी योग्य वेळी तरतूद करण्याची आवश्यकता आहे, असे पाटील यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

“सर्वकाही या दोन खेळाडूंवर अवलंबून आहे. त्यांना खेळणे सुरू ठेवायचे आहे का? ते त्यांची फिटनेस टिकवून ठेवू शकतील का? निवड समितीची रणनीती काय आहे? निवड समिती भविष्याचा विचार करत आहे का? सध्याच्या खेळाडूंसोबतच, जर त्यांना संघातून वगळण्याची वेळ आली, तर त्यांची जागा घेण्यासाठी आपल्याकडे पुरेसा सक्षम खेळाडू आहे का, याचाही विचार आपल्याला नेहमी करावा लागतो,” असे पाटील यांनी म्हटले आहे.

“मी आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे भारतीय संघाच्या राखीव खेळाडूंच्या ताकदीचा विचार करता, विराट किंवा रोहित संघात असोत वा नसोत , मला नाही वाटत की काही अडचण येईल,” असेही पाटील यांनी म्हटले आहे.

“हे दोन्ही खेळाडू अनेक वर्षांपासून खेळत आहेत आणि त्यांना दिग्गज मानले जाईल. रोहित हा व्हाईट बॉल क्रिकेटमधील एक उल्लेखनीय खेळाडू आहे. तसेच विराटबद्दल जितके जास्त बोलावे, तितके कमी आहे,” असे पाटील यांनी पुढे म्हटले आहे.

रोहित आणि विराट यांनी टी 20 आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. ते दोघे भारताकडून केवळ एकदिवसीय प्रकारचे सामने खेळतात. ते दोघे घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत खेळताना दिसणार आहेत. ही मालिका 27 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. (Sandeep Patil About Rohit Sharma and Virat Kohli playing in 2027 ODI World Cup)

Comments are closed.