भारताकडे आता 'काल' ड्रोन पॉवर आहे.
पल्ला 1000 किमीपर्यंत : ‘आयजी डिफेन्स’कडून पोखरणमध्ये चाचणी : 50 किलो पेलोडसह शत्रूचा नाश करण्याची क्षमता
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारताची खासगी संरक्षण तंत्रज्ञान कंपनी ‘आयजी डिफेन्स’ने राजस्थानमधील पोखरण फील्ड फायरिंग रेंजमध्ये आपल्या लांब पल्ल्याच्या, एकमार्गी ‘काल’ ड्रोनची उ•ाण चाचणी पूर्ण केली आहे. या चाचणीदरम्यान ड्रोन एका वाहनावर बसवलेल्या प्रक्षेपण प्लॅटफॉर्मवरून प्रक्षेपित करण्यात आला. ड्रोनची एअरफ्रेम, इंजिन, नेव्हिगेशन आणि मिशन सिस्टीम एकत्रितपणे काम करू शकतात की नाही, हे तपासणे हा या चाचणीचा उद्देश होता. ‘काल’ने चाचणीदरम्यान किती अंतर कापले किंवा तो किती वेळ हवेत उडाला यासंबंधीची माहिती कंपनीने उघड केलेली नाही. तसेच ड्रोनमध्ये प्रत्यक्ष स्फोटक पेलोड बसवला होता की नाही किंवा त्याने लक्ष्यावर मारा केला होता की नाही, हे देखील स्पष्ट करण्यात आलेले नाही.
‘काल’ची रचना लांब पल्ल्याच्या, एकमार्गी हल्ला मोहिमांसाठी करण्यात आल्याची माहिती आयजी डिफेन्स कंपनीकडून देण्यात आली. हा ड्रोन जास्तीत जास्त 1,000 किलोमीटरचा पल्ला गाठू शकतो आणि अंदाजे 7 ते 8 तास हवेत राहू शकतो. तो 50 किलोग्रॅमपर्यंतचा भार वाहून नेऊ शकतो, असे म्हटले जाते. हा ड्रोन अंदाजे 5,000 मीटर उंचीवर कार्यरत राहू शकतो, असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे.
स्वयंचलित उ•ाणासाठी ‘काल’ मल्टी-बँड ग्लोबल नॅव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम आणि इनर्शियल नॅव्हिगेशन सिस्टीमचा वापर करतो. लक्ष्यावर पोहोचल्यावर आपले मिशन पूर्ण करण्यासाठी याची रचना केली आहे. गरज आणि ऑपरेशनल परवानगीनुसार, रडार आस्थापने, हवाई संरक्षण प्रणाली आणि महत्त्वपूर्ण पायाभूत सुविधांविरुद्धच्या मोहिमांसाठी ‘काल’ ला कॉन्फिगर केले जाऊ शकते.
अलिकडच्या युद्धांमध्ये लांब पल्ल्याच्या एकमार्गी हल्ला करणाऱ्या ड्रोनची भूमिका वाढली आहे. लांब पल्ल्याचे उ•ाण, स्वयंचलित कार्यप्रणाली, भार वाहून नेण्याची क्षमता आणि मोठ्या प्रमाणावर देशांतर्गत उत्पादन या बाबी लक्षात घेऊन ‘काल’ विकसित करण्यात आला आहे. काही आखाती देशांनी ‘काल’मध्ये स्वारस्य दाखवले आहे. तथापि, कोणताही ग्राहक, करार किंवा निश्चित निर्यात ऑर्डरची माहिती उघड केलेली नाही. परदेशात ड्रोनच्या विक्रीसाठी भारत सरकारकडून आवश्यक मंजुरी आणि निर्यात परवानगीची आवश्यकता असल्यामुळे तूर्तास याबाबत गोपनीयता पाळली जात आहे.
रशिया-युक्रेन युद्धानंतर एकतर्फी ड्रोनचा वापर वाढला
रशिया-युक्रेन युद्ध आणि पश्चिम आशियातील विविध संघर्षांदरम्यान लांब पल्ल्याच्या एकतर्फी हल्ला करणाऱ्या ड्रोनचा वापर लक्षणीयरीत्या वाढला आहे. अशा ड्रोनचा वापर तुलनेने कमी खर्चात लष्करी तळ आणि पायाभूत सुविधांना लक्ष्य करण्यासाठी तसेच शत्रूच्या हवाई संरक्षण प्रणालीवर दबाव आणण्यासाठी केला जातो.
Comments are closed.