केरळमध्ये पूर आणि भूस्खलनात पाच जणांचा मृत्यू.

वृत्तसंस्था/ मलप्पुरम

केरळमध्ये डोंगराळ भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे रविवारी संध्याकाळी मलप्पुरम जिह्यातील निलंबूरच्या चोक्कड परिसरात कोट्टापुझा नदीला अचानक पूर आला. याचदरम्यान या भागात भूस्खलनाच्या घटनाही घडल्या आहेत. भूस्खलन, डोंगर कोसळणे आणि अचानक आलेल्या पुराच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये पाच जणांचा मृत्यू झाला असून, दोघे बेपत्ता आहेत. टी. के. नगरजवळ पाण्याच्या जोरदार प्रवाहात सहा जण वाहून गेले. एनडीआरएफ, अग्निशमन दल आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे केलेल्या शोध मोहिमेदरम्यान सोमवारी दुपारपर्यंत पाच मृतदेह सापडले.

सोमवारी केरळमध्ये सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा मारा सुरू होता. हवामान विभागाने पथानामथिट्टा, कोट्टायम, अलाप्पुझा, एर्नाकुलम, इडुक्की आणि त्रिशूरसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. यापूर्वी रविवारी, इडुक्की आणि मलप्पुरमसह अनेक जिह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार माजला होता. नदीच्या पाण्याच्या पातळीत अचानक वाढ झाल्यामुळे काही लोक वाहून गेले होते. रविवारी रात्री दोन मृतदेह तर सोमवारी सकाळी इतर तीन मृतदेह सापडले. मृत झालेले पाचही जण पर्यटक असल्याचे मानले जात आहे. नदीकाठावर कपडे धुताना वाहून गेलेल्या सजिथा (26) या स्थानिक महिलेचा शोध सुरू आहे.

इडुक्की, कोट्टायममध्ये भूस्खलनाचा कहर

मुसळधार पावसामुळे राज्यातील डोंगराळ भागातील परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. रविवारी संध्याकाळी इडुक्की आणि कोट्टायम जिह्यांमध्ये वेगवेगळ्या भूस्खलनांमध्ये चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. प्रशासनाने संवेदनशील डोंगराळ भागात अतिरिक्त दक्षतेचे आदेश जारी केले असून, बाधित भागातून लोकांना बाहेर काढले जात आहे.

सहा जिह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट

भारतीय हवामान विभागाने केरळच्या सहा प्रमुख जिह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पथानामथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम, इडुक्की, एर्नाकुलम आणि त्रिशूर येथे 115.6 मिमी ते 204.4 मिमी पर्यंत पाऊस पडू शकतो. ताशी 40 किमी वेगापर्यंतचे सोसाट्याचे वारे आणि विजांच्या कडकडाटासह मेघगर्जनेचीही शक्यता आहे. कोल्लम, पालक्काड आणि कन्नूर जिह्यांमध्येही हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

प्रशासनाचा इशारा

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना राज्यभरातील पावसाचा आणि पाणी साचण्याच्या स्थितीचा तासातासाला आढावा घेण्याचे निर्देश दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन आयुक्त विघ्नेश्वरी यांनी इडुक्की आणि कोट्टायमच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत तातडीची बैठक घेतली आहे. संभाव्य धोका असलेल्या भागांतील नागरिकांना एसएमएसद्वारे सूचना पाठवल्या जात आहेत. प्रशासनाने लोकांना पाणी साचलेले रस्ते, दुथडी भरून वाहणाऱ्या नद्या आणि भूस्खलनाची शक्यता असलेल्या डोंगराच्या उतारांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

Comments are closed.