बॅनर्जी यांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याची तयारी.

पक्षचिन्ह गोठवल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने तातडीने सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली. या याचिकेत ममता बॅनर्जी यांनी टीएमसीच्या दोन प्रतिस्पर्धी गटांमधील वादामुळे तृणमूल काँग्रेसचे नाव आणि निवडणूक चिन्ह गोठवण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर हा मुद्दा मांडत तातडीच्या सुनावणीची मागणी केली.

निवडणूक आयोगाने शुक्रवारी दोन प्रतिस्पर्धी गटांना वेगवेगळी नावे आणि निवडणूक चिन्हे दिली होती. यासंबंधीचा मुद्दा उपस्थित करीत कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. राज्यात विधानसभा पोटनिवडणुकीची प्रक्रिया सुरू असताना अधिसूचनेच्या मध्यातच निवडणूक चिन्ह गोठवले जाणे पूर्णपणे अयोग्य असल्याचे स्पष्ट केले. आम्हाला हे प्रकरण तात्काळ सुनावणीसाठी हवे आहे, अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. त्यावर न्यायालयाने सकारात्मकता दर्शवत तात्काळ सुनावणी घेण्याची तयारी दर्शवली. तृणमूल काँग्रेसच्या चिन्हावर बंदी घालण्याच्या मुद्यावर तातडीच्या सुनावणीसाठी सर्वोच्च न्यायालयाने याचिका स्वीकारली आहे.

सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या आपल्या याचिकेत ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोग आणि पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते ऋतब्रत बॅनर्जी यांना प्रतिवादी म्हणून नाव दिले आहे. पश्चिम बंगालमधील दोन विधानसभा जागांसाठी 6 ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होणार आहे. गटबाजीच्या वादात अडकलेल्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला निवडणूक आयोगाने ‘ममता ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस’ हे नाव आणि ‘फुटबॉलपटू’ हे निवडणूक चिन्ह दिले आहे, तर प्रतिस्पर्धी गटाला ‘डेमोक्रॅटिक तृणमूल काँग्रेस’ हे नाव देण्यात आले आहे.

निवडणूक आयोगाने गुरुवारी रात्री तृणमूल काँग्रेसच्या नावावर आणि चिन्हावर बंदी घातली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी, ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेत आयोगाच्या आदेशाला स्थगिती देण्यासाठी तातडीच्या सुनावणीची विनंती करण्यात आली आहे. तथापि, या प्रकरणाची सुनावणी कधी होईल याबाबत अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

निवडणुका धामधुमीत चिन्ह गोठवण्याला विरोध

ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी ममता बॅनर्जी यांच्यावतीने न्यायालयासमोर प्रभावीपणे भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला. पक्षात दोन गट पडल्याचा प्रकार जूनमध्ये सुरू झाला. आम्ही जुलैमध्ये आमचे निवेदन सादर केले. मात्र, निवडणूक आयोगाने अद्याप काहीही न करता निवडणुका धामधुमीत आमचे नाव आणि चिन्ह गोठवले आहे. आयोग एक नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. निवडणूक आयोगाने निवडणूक अधिसूचनेच्या धामधुमीत चिन्ह गोठवण्याचा निर्णय जारी केला आहे. हे काय चालले आहे? आम्ही विनंती करतो की हे प्रकरण तातडीच्या सुनावणीसाठी सूचीबद्ध केले जावे, असे सिब्बल म्हणाले.

सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले?

निवडणूक आयोगाच्या आदेशाला स्थगिती देण्यासाठी याचिकेत तातडीच्या सुनावणीची विनंती करण्यात आली होती. त्यावर सर्व पक्षांना त्यांची मते मांडण्याची संधी मिळेल. जेव्हा हे प्रकरण सूचीबद्ध केले जाईल, तेव्हा तुम्ही तुमचे युक्तिवाद सादर कराल. आम्ही हे प्रकरण सूचीबद्ध करण्याचा प्रयत्न करू.  त्यामुळे, या प्रकरणाची सुनावणी कधी होईल यावर मुख्य लक्ष असेल, असे सरन्यायाधीशांनी सांगितले.

 

Comments are closed.