हिंदुस्थानच्या दोन्ही संघांची उपांत्यपूर्व फेरीत धडक, टेबल टेनिसमध्ये पाकिस्तानचा फडशा
हिंदुस्थानी टेबल टेनिसपटूंनी आशियाई क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानचा अक्षरशः फडशा पाडला. आधी महिला संघाने आणि त्यानंतर पुरुष संघाने पाकिस्तानचा 3-0 असा एकतर्फी पराभव करत अंतिम आठमध्ये धडाक्यात प्रवेश केला.
महिलांनी तीनही सामने जिंकले
हिंदुस्थानच्या सुतीर्था मुखर्जी, सिंड्रेला दास आणि श्रीजा अपुला या त्रिपुटाने पाकिस्तानविरुद्ध एकही सामना हातातून जाऊ दिला नाही. सुतीर्थाने सुरुवातीच्या सामन्यात थेट गेममध्ये विजय मिळवत हिंदुस्थानला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर सिंड्रेला दासने पुलसुम खानचा समाचार घेतला. सिंड्रेलाने पहिला गेम 11-6, दुसरा 11-7, तर तिसरा 11-5 असा जिंकत हिंदुस्थानची आघाडी 2-0 केली. तिसऱया सामन्यात श्रीजा अपुलाने फातिमा खानला अक्षरशः निष्प्रभ केले. श्रीजाने पहिला आणि दुसरा गेम 11-4 असा जिंकला, तर तिसऱया गेममध्ये 11-5 असा विजय मिळवत हिंदुस्थानच्या 3-0 विजयावर शिक्कामोर्तब केले.
पुरुष गटातही पाकिस्तानची पाटी कोरी
महिलांनंतर हिंदुस्थानी पुरुष संघानेही पाकिस्तानच्या विजयाची पाटी कोरीच ठेवली. हरमीत देसाई, जी. साथियान आणि पायस जैन यांनी सलग तीन विजय मिळवत पाकिस्तानचा 3-0 असा धुव्वा उडवला. हरमीत देसाईने मोहम्मद खानचा 11-4, 11-3, 11-5 असा सहज पराभव केला. त्यानंतर जी. साथियानने अब्बास खानला 11-1, 11-8, 11-9 असे नमवले. तिसऱया सामन्यात पायस जैनने मोहम्मद खानला हरवत हिंदुस्थानचा विजय पूर्ण केला.
Comments are closed.