“रोहित शर्मा, विराट कोहली टीम इंडियाचे कोहिनूर, फिट असतील आणि धावा करत असतील तर…”, चेतन शर्मा यांचे मोठे विधान

>> गणेश पुराणिक

टीम इंडियाचे दोन दिग्गज फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या भवितव्याबाबत सुरू असलेल्या चर्चेदरम्यान हिंदुस्थानचे माजी मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. रोहित आणि विराट फिट असतील तसेच हिंदुस्थानसाठी धावा करत असतील, तर त्यांना 2027 वनडे वर्ल्ड कपसाठी संघात निवडले पाहिजे, असे चेतन शर्मा यांनी म्हटले आहे. तसेच रोहित आणि विराट हे हिंदुस्थानी क्रिकेटचे कोहिनूर असल्याचेही चेतन शर्मा यांनी म्हटले.

“वय हा फक्त एक आकडा आहे. जर ते चांगले खेळत असतील, धावा करत असतील, तर समस्या काय आहे? आपल्याला ट्रॉफी जिंकून देणारे खेळाडू हवे आहेत आणि हे दोघेही ते करण्यास सक्षम आहेत”, असे चेतन शर्मा स्पष्ट म्हणाले. सॅल्युट तिरंगा क्रिकेट लीगच्या निमित्ताने त्यांनी ‘सामना ऑनलाइन’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी रोहित शर्माच्या अलीकडील कामगिरीचाही उल्लेख केला.

“रोहितने नुकतेच शतक झळकावले आहे. प्रत्येक सामन्यात तो धावा करेलच असे नाही. पण तो आणि विराट हिंदुस्थानसाठी खेळताना आणि ट्रॉफी जिंकून देताना पाहायला मला आवडते,” असे चेतन शर्मा यांनी सांगितले. रोहित शर्माने जुलैमध्ये इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर झालेल्या तिसऱ्या वनडे सामन्यात 138 धावांची शानदार खेळी केली होती.

‘रोहितला आम्ही कर्णधार बनवले, कारण…’

रोहित शर्माच्या नेतृत्वाचा संदर्भ देताना चेतन शर्मा यांनी त्यांच्या निवड समितीच्या कार्यकाळाची आठवण करून दिली. “जेव्हा मी मुख्य निवडकर्ता होतो, तेव्हा आम्ही रोहितला कर्णधार बनवले. आम्हाला त्याच्यावर विश्वास होता, म्हणूनच त्याला कर्णधार केले,” असे ते म्हणाले.

देशांतर्गत क्रिकेटला महत्त्व द्यायला हवे

हिंदुस्थानी संघाच्या निवडीबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना चेतन शर्मा यांनी देशांतर्गत क्रिकेटच्या कामगिरीला महत्त्व देण्याची गरज व्यक्त केली. “एखादा खेळाडू देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत असेल, तर त्याला भारतीय संघात संधी मिळायला हवी. बीसीसीआय देशांतर्गत क्रिकेट आयोजित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसा आणि मेहनत खर्च करते. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटचा आदर करणे महत्त्वाचे आहे. खेळाडू फिट असेल, तर त्याने रणजी ट्रॉफी किंवा प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले पाहिजे,” असे चेतन शर्मा म्हणाले.

काय आहे लीगची संकल्पना?

लीगबाबत बोलताना चेतन शर्मा यांनी सांगितले की, आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही होतकरू क्रिकेटपटूला संधीपासून वंचित राहू नये, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. देशभरातील 14 शहरांमध्ये ट्रायल्स घेण्यात आल्या असून, 400 खेळाडूंमधून 120 खेळाडूंची निवड केली जाणार आहे. या खेळाडूंच्या प्रवास आणि राहण्याचा खर्च आयोजकांकडून केला जाणार आहे. या उपक्रमाशी अनेक माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूही जोडले गेल्याचे चेतन शर्मा यांनी सांगितले.

Comments are closed.