तुमच्या लढय़ात सर्वतोपरी मदत करणार, साहिलच्या आईवडिलांना राहुल गांधी यांचे आश्वासन

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज मुंबई आयआयटीमध्ये आत्महत्या करणाऱ्या साहिल वाकोडे या विद्यार्थ्याचे आईवडील रवींद्र आणि सोनाली यांच्याशी व्हिडीओ कॉलवरून चर्चा केली. साहिलला न्याय मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या लढय़ात सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन राहुल गांधी यांनी वाकोडे कुटुंबीयांना दिले.

रवींद्र आणि सोनाली हे वाशिम जिह्यातून मुंबईकडे प्रवास करत असताना राहुल गांधी यांनी त्यांना व्हिडीओ कॉल केला. सुमारे 17 मिनिटे राहुल गांधी यांनी साहिलच्या आईवडिलांसोबत संवाद साधला. राहुल गांधी यांनी साहिलच्या आईवडिलांना धीर दिला. या लढय़ात आवश्यक ती सर्व मदत करण्याचे आश्वासन राहुल यांनी दिले. मुंबईत आल्यानंतर साहिलचे आईवडील गुरुवारी आयआयटी मुंबईबाहेर उपोषणाला बसणार होते. मात्र तेथे त्यांना परवानगी देण्यात आली नाही. अखेर त्यांनी आझाद मैदान येथे उपोषण सुरू केले परंतु तेथेही त्यांना परवानगी न दिल्यामुळे रात्री ते तिथून निघाले.

आयआयटीबाहेर काँग्रेसचे तीव्र आंदोलन

साहिल वाकोडे या मागासवर्गीय विद्यार्थ्याचा जातीवाचक व मानसिक छळ केल्यामुळेच त्याने आत्महत्या केली. ही आत्महत्या नसून संस्थेने केलेली हत्या आहे. साहिलच्या आत्महत्येस संस्थेतील प्राध्यापक सूर्यनारायण डुल्ला हे जबाबदार असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांचा बचाव केला जात आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. साहिलच्या आत्महत्या प्रकरणाची सखोल चौकशी करा, पण त्याआधी संबंधितांना अटक करा, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

Comments are closed.