हिंदुस्थानला नेमबाजीमध्ये कांस्यपदक, अनंतजीत-परीनाज जोडीची दमदार कामगिरी
हिंदुस्थानी नेमबाजांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन दिवसांत तिसरे पदक जिंकण्याचा पराक्रम केला. अनंतजीतसिंग नरुका आणि परिनाज धालिवाल यांनी मिश्र सांघिक स्कीट प्रकारात कांस्यपदकाची कमाई करत हिंदुस्थानच्या खात्यात आणखी एका पदकाची भर घातली. हिंदुस्थानी जोडीने अंतिम फेरीत 44 गुणांची नोंद करत तिसरे स्थान मिळविले.
नरुका आणि धालिवाल यांनी पात्रता फेरीत 150 पैकी 138 गुणांसह चौथे स्थान मिळवत अंतिम फेरी गाठली होती. तीन पात्रता फेऱयांत हिंदुस्थानी जोडीने अनुक्रमे 44, 47 आणि 47 गुणांची नोंद केली. अंतिम फेरीत हिंदुस्थानी जोडीने सुरुवातीपासून सातत्यपूर्ण कामगिरी केली. सहा मालिकांमध्ये 7, 7, 7, 8, 7 आणि 8 गुण मिळवत त्यांनी एकूण 44 गुणांची कमाई केली आणि कांस्यपदकावर शिक्कामोर्तब केले. चीनने 52 गुणांसह सुवर्णपदक पटकावले. चीनची ही कामगिरी विश्वविक्रम ठरली. दक्षिण कोरियाने 51 गुणांसह रौप्यपदक मिळविले.
स्कीटमध्ये तिसरे पदक
अनंतजीतसिंग नरुका आणि परिनाज धालिवाल यांनी नेमबाजीच्या स्कीट प्रकारात हिंदुस्थानला तिसरे पदक जिंपून दिले. बुधवारी नरुका पुरुषांच्या सांघिक संघाचा भाग होता, तर धालिवालने रैझा धिल्लो आणि महेश्वरी चौहान यांच्यासह महिला सांघिक स्कीटमध्ये कांस्यपदक पटकावले होते. नरुकाने वैयक्तिक पुरुष स्कीटमध्येही पदकाच्या अगदी जवळ पोहोचत चौथे स्थान मिळविले. धालिवालने महिलांच्या अंतिम फेरीत प्रवेश केला, मात्र तिला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले.
10 मीटर एअर पिस्तूलमध्ये चौथा जागा
दरम्यान, पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल सांघिक पात्रता फेरीत हिंदुस्थानच्या कमलजीत, आकाश भारद्वाज आणि केदारलिंग बालकृष्ण उचागानवे यांना अंतिम फेरी गाठता आली नाही. हिंदुस्थानी संघाने 1727-53 एक्स गुणांसह चौथे स्थान मिळविले. कमलजीतने 580-18 एक्स, आकाश भारद्वाजने 579-20 एक्स, तर केदारलिंग उचागानवेने 568-15 एक्स गुणांची नोंद केली.
Comments are closed.