चेन्नईनंतर मुंबई इंडियन्सचेही पत्ते ओपन; आगामी हंगामापूर्वी स्टार खेळाडूची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती, RCB ला मिळवून दिलेले विजेतेपद

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

महिला प्रीमियर लीगच्या आगामी (WPL 2027) हंगामापूर्वी फ्रँचायझींमध्ये हालचालींना वेग आला आहे. इंडियन प्रीमियर लीगमधील सर्वात यशस्वी संघापैकी एक असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जनंतर आता महिला प्रीमियर लीगमधील यशस्वी संघ मुंबई इंडियन्सनेही आपले पत्ते ओपन करत मोठ्या बदलाची घोषणा केली आहे. दोन वेळा WPL चॅम्पियन राहिलेल्या मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू ल्यूक विल्यम्स यांची महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी अधिकृत नियुक्ती केली आहे.

माजी प्रशिक्षक लिसा केटली यांनी अवघ्या एका हंगामानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने मुंबई इंडियन्सने ल्यूक विल्यम्स यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. ४६ वर्षीय विल्यम्स हे महिला क्रिकेट जगतातील अत्यंत अनुभवी आणि यशस्वी प्रशिक्षक मानले जातात. ल्यूक विल्यम्स यांच्याकडे फ्रँचायझी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोठा अनुभव आहे.

२०२४ च्या WPL हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाला पहिलेवहिले ट्रॉफी मिळवून देण्यात विल्यम्स यांचा मुख्य वाटा होता. तसेच ऑस्ट्रेलियाच्या वुमेन्स बिग बॅश लीगमध्ये (WBBL) ॲडलेड स्ट्रायकर्सला २०२२-२३ मध्ये चॅम्पियन बनवण्यात आणि इंग्लंडच्या ‘द हंड्रेड’ स्पर्धेत ‘सदन ब्रेव्ह’ संघाला २०२३ मध्ये विजेतेपद मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. २०२५ पासून ते इंग्लंडच्या महिला संघाचे सहाय्यक प्रशिक्षक म्हणूनही जबाबदारी सांभाळत आहेत.

MI ला पुन्हा रुळावर आणण्याचे आव्हान

हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई इंडियन्ससाठी २०२६ चा हंगाम निराशाजनक ठरला होता. संघाने ८ पैकी केवळ ३ सामने जिंकले असून गुणतालिकेत चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. त्यामुळे आगामी २०२७ च्या हंगामात मुंबईला पुन्हा एकदा विजेतेपदाच्या शर्यतीत आणण्याचे मोठे आव्हान ल्यूक विल्यम्स यांच्यासमोर असणार आहे.

“संघाला नव्या उंचीवर नेणार” – नीता अंबानी

मुंबई इंडियन्सच्या मालक नीता अंबानी यांनी या निवडीचे स्वागत करताना म्हटले, “ल्यूक विल्यम्स यांचे मुंबई इंडियन्स कुटुंबात स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. ल्यूक हे एक विजेते प्रशिक्षक असून त्यांच्याकडे महिला क्रिकेटची उत्तम समज आहे. ल्यूक यांचे मार्गदर्शन आणि हरमनप्रीतचे नेतृत्व याच्या जोरावर संघ पुन्हा एकदा नवे यश संपादन करेल असा मला विश्वास आहे.”

तर मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्यानंतर ल्यूक विल्यम्स म्हणाले, “मुंबई इंडियन्ससारख्या दिग्गज आणि आदरणीय फ्रँचायझीशी जोडला गेल्याचा मला प्रचंड आनंद आहे. एक मजबूत संघ उभारून आक्रमक क्रिकेट खेळणे आणि चाहत्यांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असेल.”

Comments are closed.