वाड्यात गोदामाची भिंत कोसळून तीन कामगार ठार, टिना रबर कंपनीतील घटना
वाडा विक्रमगड महामार्गावरील टिना रबर कंपनीच्या स्टोअर रूमची भिंत कोसळून तीन कामगार ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी घडली. मृतांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. मीरा गवळी, रंजना कोंब आणि केशव गुणगुणा अशी मृतांची नावे आहेत. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
वाडा तालुक्यातील पाली ग्रामपंचायतीच्या हद्दीत टिना रबर कंपनी आहे. या कंपनीत टायरवर प्रक्रिया करून उत्पादन घेतले जाते. कंपनीच्या स्टोअर रूममध्ये कच्चा व पक्का माल भरून गोणी ठेवल्या होत्या. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या स्टाओर रूममध्ये तीन कामगार खाली बसून नाष्टा करत होते. याचवेळी या खोलीत भरून ठेवलेल्या गोणींचा दाब भिंतीवर आल्याने भिंत अचानक कोसळली. मलब्याखाली केशव, मीरा व रंजना हे तीन कामगार दबून गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेने घटनास्थळी धाव घेऊन भिंतीखाली दाबलेल्या कामगारांना बाहेर काढून वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तोपर्यंत तीनही कामगारांचा मृत्यू झाला होता.
दुःखाचा डोंगर कोसळला
दुर्घटनेचे नेमके कारण काय? तसेच कंपनीतील सुरक्षा व्यवस्थेबाबत काही त्रुटी होत्या का याचा अधिक तपास वाडा पोलीस करत आहेत. या घटनेमुळे मृत कामगारांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वाडा पोलीस ठाण्यात याची नोंद करण्यात आली आहे. मृत तीनही कामगार स्थानिक नागरिक आहेत. कंपनीच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा बळी गेल्याचा आरोप करत कामगारांची प्रत्येकी २५ लाखांची नुकसानभरपाई द्या, अशी मागणी मृतांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
Comments are closed.