IND vs WI: वेस्ट इंडिजविरुद्ध मालिकेत या 3 खेळाडूंची परीक्षा! 2027च्या विश्वचषक शर्यतीत संघातील स्थान टिकवावं लागणार

आगामी काळात भारतीय संघाचे (Indian cricket team) लक्ष आतापासूनच 2027 च्या (Odi WC 2027) विश्वचषकावर लागले आहे. वनडे विश्वचषक सुरू होण्यासाठी अजून जवळपास एक वर्षाचा कालावधी बाकी आहे. मात्र, भारतातील अनेक खेळाडूंचे लक्ष आतापासूनच या मोठ्या स्पर्धेत खेळण्यावर आहे. त्यापैकी तीन भारतीय खेळाडूंची वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवड झाली आहे. या तीन (India vs West Indies) खेळाडूंचे लक्षही 2027 च्या विश्वचषकावर आहे. त्यामुळे वेस्ट इंडिजविरुद्धची वनडे मालिका या तीन खेळाडूंसाठी महत्त्वाची ठरणार असून, त्यांच्या कामगिरीवर विश्वचषकातील निवडीसाठीची दावेदारी अवलंबून असणार आहे.

2027 च्या विश्वचषकासाठी प्रसिद्ध कृष्णा, नितीश कुमार रेड्डी आणि गुरनूर बरार यांना दमदार कामगिरी करून आपले स्थान मजबूत करावे लागणार आहे. या तिन्ही खेळाडूंना वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत संधी मिळाली आहे.

नितीश कुमार रेड्डीची (Nitish Kumar Reddy) सुरुवातीला 2026 च्या आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली होती. मात्र, नंतर त्याचा वनडे मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला. नितीशला वनडे मालिकेत संधी देऊन संघ व्यवस्थापनाने 2027 च्या विश्वचषकासाठी त्याच्याकडे लक्ष असल्याचे संकेत दिले आहेत. आता या संधीचा तो कसा फायदा घेतो, हे त्याच्या कामगिरीवर अवलंबून असेल. हार्दिक पांड्याचा (Hardik pandya) पर्याय म्हणूनही नितीशकडे पाहिले जात आहे, कारण हार्दिकला अनेकदा दुखापतींचा सामना करावा लागतो.

प्रसिद्ध कृष्णाबद्दल (Prasiddh krishna) बोलायचे झाल्यास, या वेगवान गोलंदाजाला सध्या भारतीय संघात सातत्याने संधी मिळत आहेत. तो भारतासाठी कसोटी मालिकेतही नियमितपणे खेळत आहे. मोहम्मद शमीच्या (Mohmmed Shami) अनुपस्थितीत प्रसिद्ध कृष्णाला अनेक संधी मिळाल्या आहेत. त्यामुळे 2027 चा विश्वचषक खेळायचा असेल, तर वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत शानदार कामगिरी करून त्याला आपली दावेदारी मजबूत करावी लागेल.

गुरनूर बरारलाही (Gurnoor Barar) भारतीय वनडे संघात संधी मिळत आहेत. अफगाणिस्तान आणि इंग्लंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेनंतर आता त्याचा वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठीही भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. त्याला सातत्याने संधी मिळत असल्याने संघ व्यवस्थापन त्याच्याकडे भविष्यातील खेळाडू म्हणून पाहत असल्याचे दिसते. आता गुरनूरची गोलंदाजी त्याची 2027 च्या विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड होणार की नाही, हे ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल.

त्यामुळे या तिन्ही खेळाडूंना वेस्ट इंडिजविरुद्ध दमदार कामगिरी करून आपली दावेदारी मजबूत करावी लागणार आहे. 2027 च्या विश्वचषकासाठी भारतीय संघ व्यवस्थापन सध्या चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या खेळाडूंनाच संधी देण्याचा प्रयत्न करेल.

Comments are closed.