रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक, पश्चिम आणि ट्रान्सहार्बर मार्गावर लोकलसेवा नियमित सुरू राहणार

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

विविध तांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर रविवारी सकाळी 11.05 ते दुपारी 3.45 पर्यंत अप आणि डाऊन जलद मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान ब्लॉक घेण्यात येईल, तर हार्बर मार्गावर वाशी ते कुर्ला दरम्यान सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 या वेळेत डाऊन आणि अप दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉकचे आयोजित करण्यात आले आहे.

ब्लॉक कालावधीत सकाळी 10.36 ते दुपारी 3.10 दरम्यान सीएसएमटी मुंबईहून सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा स्थानकात डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. या गाड्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान त्यांच्या नियोजित स्थानकांवर थांबतील आणि नियोजित स्थळी जवळपास 15 मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाण्याच्या पुढे पुन्हा डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील.

सकाळी 11.03 ते दुपारी 3.38 दरम्यान ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथील अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळवण्यापूर्वी गाड्या मुलुंड आणि माटुंगा दरम्यान त्यांच्या नियोजित स्थानकांवर थांबतील. गंतव्यस्थानी सुमारे 15 मिनिटे उशिरा पोहचतील.

हार्बर मार्गावर कुर्ला-वाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावर सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 दरम्यान सीएसएमटीहून सुटणाऱ्या वाशी, बेलापूर आणि पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन लोकल त्याचप्रमाणे सकाळी 10.17 ते दुपारी 3.47 दरम्यान पनवेल, बेलापूर आणि वाशीहून सुटणाऱ्या सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल सेवा बंद राहतील.

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी-कुर्ला-सीएसएमटी आणि पनवेल-वाशी-पनवेल दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. ब्लॉक दरम्यान हार्बर मार्गावरील प्रवाशांना ठाणे-वाशी/नेरुळ स्थानकावरून सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत प्रवास करण्याची परवानगी असेल. ट्रान्स हार्बर, उरण बंदर आणि वेस्टर्न लाईन्सवर कोणताही ब्लॉक नाही.

Comments are closed.