दुबई विमानाची घटना म्हणजे दहशतवादच!

होता पूर्वनियोजित कट, दुबईकडून चौकशी होणार

उंचावली देशाची मान…

  • कॅप्टन स्मित मच्छार यांच्या अतुलनीय धैर्याचा संपूर्ण देशाला अभिमान
  • त्यांची प्रकृती ठणठणीत व्हावी, यासाठी देशभरातील मंदिरांमध्ये प्रार्थना
  • साऱ्या जगातून कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर होत आहे प्रशंसेचा वर्षाव

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

दुबईहून इस्रायलला निघालेले ‘फ्लायदुबई’चे विमान अदळविण्याचेच कारस्थान रचण्यात आलेले होते, असा स्पष्ट संकेत आतापर्यंतच्या तपासातून मिळत आहे. हे कारस्थान पूर्वनियोजित होते, असेही उघड होत असून सखोल चौकशीचा आदेश देण्यात आला आहे. हे विमान चालविणारे मुख्य वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांचे साहस आणि प्रसंगावधान यामुळे हा दहशतवादी हल्ला टळला आहे. त्यामुळे मच्छार यांच्यावर भारतासह जगातून कौतुकाचा आणि प्रशंसेचा वर्षाव होत आहे. या विमानात मुख्य वैमानिक स्मित मच्छार हे होते. त्यांचा सहकारी वैमानिक ओमानचा होता. या सहकारी वैमानिकाची योजना हे विमान ताब्यात घेऊन ते आदळवून दहशतवादी हल्ला करण्याची होती. अमेरिकेत ज्या प्रमाणे 9 नोव्हेंबर 2001 या दिवशी विमाने आदळवून दहशतवादी हल्ले करण्यात आले होते, त्याचीच पुनरावृत्ती करण्याचा हा प्रयत्न होता, हे आता स्पष्ट होऊ लागले आहे.

मच्छार यांना भोसकले

ओमानी वैमानिकाने या विमानाचा ताबा मिळविण्यासाठी मुख्य वैमानिक कॅप्टन स्मित मच्छार यांना चाकूने भोसकून गंभीर जखमी केले. तथापि, तशा रक्तबंबाळ परिस्थितीतही त्यांनी विमानाचा ताबा सहवैमानिकाला घेऊ दिला नाही. त्यांनी कॉकपिटचे दार उघडून प्रवासी आणि इतर कर्मचाऱ्यांना सावध केले. त्यावेळी एका इस्रायली नागरीकाने त्वरित आत येऊन विमान स्थिरस्थावर केले. कॉकपिटमध्ये काय चालले आहे, हे कॅप्टन स्मित मच्छार यांनी लक्षात आणून दिले नसते, तर सहवैमानिकाचे कारस्थान यशस्वी झाली असती, असे एकंदरित दिसून येत आहे.

प्रकृती गंभीर पण स्थिर

कॅप्टन मच्छार यांना भोसकण्यात आल्याने त्याना पोटाच्या वरच्या बाजूला खोलवर जखम झाली आहे. त्यांची प्रकृती अद्याप गंभीर पण स्थिर अशी आहे. त्यांच्यावर सौदी अरेबियात तातडीचे उपचार होत आहेत. त्यांच्या कुटुंबियांना या घटनेची माहिती बुधवारीच देण्यात आली आहे. त्यांच्या समयसूचकतेमुळे आणि अतुलनीय धैर्यामुळे एक भीषण दहशतवादी हल्ला टळला असून अनेकांचे प्राण वाचले आहेत. त्यांच्या साहसाचे सर्वत्र तोंड भरुन कौतुक केले जात आहे.

पंतप्रधान मोदी यांच्याकडून प्रशंसा

एका शौर्यवान भारतीय विमानचालकामुळे एक मोठा दहशतवादी हल्ला टळला आहे, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅप्टन स्मित मच्छार यांचे कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मच्छार यांच्या कुटुंबियांशीही संपर्क साधला असून मच्छार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. सौदी अरेबियातील भारतीय दूतावासाकडूनही त्यांच्या उपचारांसंबंधी सातत्याने माहिती घेत आहे.

सर्वांकडून प्रशंसा

कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर आता भारतासह जगभरातून प्रशंसेचा वर्षाव होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, इस्रायलचे नेते बेंजामिन नेतान्याहू आणि अनेक देशांच्या नेत्यांनी त्यांचा प्रसंगावधानाचे कौतुक केले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मुंबईत कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कुटुंबियांची गुरुवारी भेट घेतली. ‘आपल्या पुत्राने असामान्य साहसाचा परिचय देत आपल्या देशाची मान उंचावलाr आहे. कॅप्टन स्मित मच्छार हे भारतातील युवकांचे खरेखुरे आदर्श आहेत,’ अशी प्रशंसा त्यांनी केली आहे.

तीन सुपरहिरो…

हा दहशतवादी प्रकार टाळण्यामध्ये आणि अनेकांचे प्राण वाचविण्यामध्ये कॅप्टन स्मित मच्छार यांच्यासह आणखी दोन महानायकांचाही सहभाग आहे. त्यांची नावे यानिव हायुन आणि डॉ. शोता मुसायेव्ह अशी आहेत. जेव्हा कॉकपिटमध्ये मच्छार यांच्यावर हल्ला झाला, त्यानंतर त्वरित यानिव हायुन यांनी त्वरित आत जाऊन हल्लेखोर सहवैमानिकाला पकडून धरले. अन्यथा त्याने पुन्हा वार करण्याचा प्रयत्न केला असता. हायुन यांनी हल्लेखोर वैमानिकाला खेचून कॉकपिटबाहेर आणले. तोपर्यंत गंभीर जखमी अवस्थेतही मच्छार यांनी नियंत्रणाबाहेर चाललेले विमान पुन्हा नियंत्रणात आणून स्थिरस्थावर केले होते. मच्छार यांनी विमान नियंत्रणात आणण्यापूर्वी ते साधारणत: 17 हजार फूट खाली आले होते. तथापि, ते पुन्हा नियंत्रणात आले. त्यानंतर डॉ. शोता मुसायेव्ह यांनी त्यांच्या डॉक्टरी ज्ञानाचा उपयोग करुन कॅप्टन स्मित मच्छार यांच्यावर तातडीचे उपचार केले. त्यामुळे त्यांचा रक्तस्राव काही प्रमाणात थांबला आणि ते पुढची कृती करण्यास सज्ज झाले. आणखी एक इस्रायली नागरीक असिफ रिझवान यांनीही हल्लेखोर वैमानिकाला पकडून धरण्यात साहाय्य केले. इतर प्रवाशांनीही या वैमानिकाला जवळपास 55 मिनिटे दाबून ठेवल्याने तो पुन्हा हल्ला करु शकला नाही, अशी माहिती आहे.

दहशतवादी अंगाने चौकशी होणार

संयुक्त अरब अमिरातीच्या प्रशासनाने या प्रकरणाची दहशतवादी हल्ला समजून चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. विमानाचा ताबा घेऊन ते कोणत्यातरी लक्ष्यावर आदळायचे आणि जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करायचे, अशी ही योजना आधीपासूनच ठरलेली होती, असे प्राथमिक तपासात आढळून आल्याने हा दहशतवादी हल्ल्याचाच प्रयत्न होता हे स्पष्ट होत आहे. त्या प्रकारे त्याची चौकशी केली जाईल. इस्रायलच्या प्रशासनानेही चौकशीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

Comments are closed.