सरकारी तिजोरीत पैशांचा पाऊस

सप्टेंबरमध्ये जीएसटी संकलन 2.03 लाख कोटी रुपयांच्या पार

चालू आर्थिक वर्षातील महिनानिहाय संकलन

  • एप्रिल 2026       2.42 लाख कोटी
  • मे 2026             1.94 लाख कोटी
  • जून 2026           1.94 लाख कोटी
  • जुलै 2026           2.11 लाख कोटी
  • ऑगस्ट 2026     2.00 लाख कोटी
  • सप्टेंबर 2026      2.03 लाख कोटी

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

दसरा-दिवाळी यासारख्या सणासुदीच्या दिवसांच्या अगदी आधी, सरकारी तिजोरीत करातून प्राप्त होणाऱ्या निधीचा मोठा ओघ जमा झाला आहे. सप्टेंबर 2026 मध्ये वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन वार्षिक तुलनेत 14.7 टक्क्यांनी वाढून 2.03 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. आयात महसुलातील लक्षणीय वाढ आणि देशांतर्गत मागणीतील वाढीमुळे ही वाढ झाली आहे. सप्टेंबर 2026 मध्ये देशांतर्गत व्यवहारांमधून होणारे जीएसटी संकलन 10.1 टक्क्यांनी वाढून अंदाजे 1.38 लाख कोटी रुपये झाले आहे. दरम्यान, आयातीतून मिळणारा जीएसटी महसूल 26 टक्क्यांनी वाढून 65,525 कोटी रुपये झाला आहे. गेल्या महिन्यात जीएसटी परताव्यामध्ये किंचित घट झाली असून, एकूण 27,001 कोटी रुपयांचे परतावे वितरित करण्यात आले. सप्टेंबर 2025 च्या तुलनेत ही घट 3 टक्के आहे. परतावा वजा केल्यावर सप्टेंबरमधील सरकारचे निव्वळ जीएसटी संकलन 18.1 टक्क्याने वाढून 1.76 लाख कोटींहून अधिक झाले.

अर्धवार्षिक संकलनात 11.6 टक्क्यांची वाढ

एप्रिल ते सप्टेंबर या आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत, एकूण जीएसटी संकलन 11.6 टक्क्यांनी वाढून 12.46 लाख कोटींहून अधिक झाले. या कालावधीत एकूण जीएसटी संकलन 10.4 टक्क्याने वाढून 10.66 लाख कोटी रुपयांहून अधिक झाले.

महाराष्ट्र राज्य देशात आघाडीवर

सप्टेंबरमध्ये अनेक प्रमुख राज्यांमध्ये जीएसटी संकलनात चांगली वाढ दिसून आली. जीएसटी संकलनाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात आघाडीवर राहिले. सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रातील जीएसटी संकलन 15 टक्क्यांनी वाढून 29,986 कोटी झाले. कर्नाटकच्या जीएसटी संकलनातही 16 टक्क्यांनी वाढ होऊन ते 13,884 कोटी रुपये झाले. गुजरातमध्येही जीएसटी महसुलात लक्षणीय वाढ झाली असून, संकलन 17 टक्के वाढून 12,222 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. उत्तर प्रदेशात जीएसटी संकलन 18 टक्क्यांनी वाढून 8,882 कोटी रुपये झाले. दिल्लीत ते 12 टक्क्यांनी वाढून 6,354 कोटी रुपये झाले. याशिवाय, तेलंगणामध्येही जीएसटी संकलन 18 टक्क्यांनी वाढून सप्टेंबरमध्ये 5,327 कोटींवर पोहोचले.

Comments are closed.