अभिषेक शर्मापासून तिलक वर्मापर्यंत… या 5 खेळाडूंच्या जोरावर भारताने जिंकले गोल्ड मेडल

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने एशियन गेम्स 2026 च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा 19 धावांनी पराभव करत सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदकावर कब्जा केला. 2023 मध्ये ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात भारताने एशियन गेम्समध्ये विजेतेपद पटकावले होते.

भारत विरुद्ध पाकिस्तान गोल्ड मेडल सामन्यात टीम इंडियाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अभिषेक शर्मा आणि तिलक वर्मा यांच्या तुफानी अर्धशतकांच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर विजयासाठी 212 धावांचे लक्ष्य ठेवले. भारत-पाकिस्तान टी-20 सामन्यांच्या इतिहासात भारताने प्रथमच 200 धावांचा टप्पा पार केला.

212 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नाही. मात्र, मोहम्मद नवाजने 94 धावांची शानदार खेळी करत काही काळ भारतीय संघाची धाकधूक वाढवली. अखेर तो पाकिस्तानला विजय मिळवून देऊ शकला नाही. पाकिस्तानचा संघ 20 षटकांत 192 धावांपर्यंतच मजल मारू शकला.

भारताच्या या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारे पाच खेळाडू कोण होते, पाहूया…

अभिषेक शर्मा- अभिषेक शर्माने भारताला तुफानी सुरुवात करून दिली. वैभव सूर्यवंशीने दुसऱ्या षटकात दोन षटकार ठोकत सुरुवात केली, त्यानंतर अभिषेकने डावाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली. अभिषेकने पुन्हा एकदा अंतिम सामन्यात अवघ्या 20 चेंडूंमध्ये अर्धशतक ठोकले. त्याने 28 चेंडूंमध्ये 61 धावांची धडाकेबाज खेळी केली. या खेळीत 3 चौकार आणि 7 गगनचुंबी षटकारांचा समावेश होता. अभिषेकने 2026 मध्ये 100 षटकारांचा, तर आपल्या टी-20 कारकिर्दीत 400 षटकारांचा टप्पाही पार केला.

टिळक वर्मा- मधल्या षटकांमध्ये भारतीय डावाची घडी विस्कटताना दिसत होती. अशावेळी सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या तिलक वर्माने 22 चेंडूंमध्ये 51 धावांची तुफानी खेळी केली. तिलकने इतर फलंदाजांसोबत मिळून डावाच्या शेवटच्या दोन षटकांमध्ये जवळपास 40 धावा वसूल केल्या. त्यामुळे भारताला 200 धावांचा टप्पा पार करता आला. अन्यथा एका क्षणी भारताचा डाव 175-180 धावांपर्यंतच मर्यादित राहण्याची शक्यता दिसत होती.

शिवम दुबे – शिवम दुबेने पाकिस्तानविरुद्ध अष्टपैलू खेळाडूची भूमिका बजावली. प्रथम त्याने तिलक वर्मासोबत सहाव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर गोलंदाजीत सॅम अय्युब आणि मोहम्मद नवाज यांचे महत्त्वाचे विकेट घेतले. 14व्या षटकात भारताला विकेटची सर्वाधिक गरज असताना दुबेने सॅम अय्युबला बाद केले. त्यानंतर डावाच्या शेवटच्या चेंडूवर 94 धावांवर खेळणाऱ्या मोहम्मद नवाजला बाद करत पाकिस्तानच्या विजयाच्या आशाही संपवल्या.

अक्षर पटेल – गोलंदाजीत अक्षर पटेल भारताचा हिरो ठरला. 212 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या पाकिस्तानला अक्षरने सुरुवातीपासूनच मोकळेपणाने खेळू दिले नाही. त्याने पाकिस्तानचा सलामीवीर माज सदाकतला 23 धावांवर, तर उस्मान खानला केवळ 3 धावांवर बाद केले. अक्षरने 4 षटकांत 29 धावा देत 2 विकेट घेतल्या.

वॉशिंग्टन सुंदर- वॉशिंग्टन सुंदरनेही 1 विकेट घेत भारताच्या विजयात योगदान दिले. त्याने पाकिस्तानचा कर्णधार साहिबजादा फरहान याचा महत्त्वाचा विकेट घेतला. साहिबजादा फरहान हा पाकिस्तानच्या संघातील अनुभवी फलंदाजांपैकी एक होता आणि भारतासाठी तो मोठा धोका ठरू शकत होता. मात्र, सुंदरने चौथ्याच षटकात त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

Comments are closed.