विज्ञान-मातंगी
>> प्रसाद ताम्हणकर, [email protected]
अथांग समुद्रात एक बोट वेगाने पुढे निघाली आहे. लाटा उसळत आहेत, वारा दिशा बदलत आहे, आजूबाजूने इतर जहाजे जात आहेत, पण या बोटीच्या सुकाणूवर कोणीही नाही. एवढेच नव्हे, तर संपूर्ण बोटीवर एकही माणूस नाही! तरीही ती स्वतचा मार्ग शोधते, समोर आलेले अडथळे ओळखते, त्यांना टाळते आणि ठरलेल्या ठिकाणी पोहोचते. विज्ञान कथेत शोभावी अशी ही बोट प्रत्यक्षात आपल्या देशात तयार झाली आहे. तिचे नाव आहे ‘मातंगी’. पुण्यातील सागर डिफेन्स इंजिनीअरिंगने विकसित केलेल्या या स्वयंचलित नौकेने मुंबई ते तुतिकोरिन म्हणजेच थुथुकुडी असा सुमारे 1,500 किलोमीटरचा समुद्री प्रवास करून हिंदुस्थानी सागरी तंत्रज्ञानाच्या क्षमतेची चुणूक दाखवली आहे. ‘सागरमाला परिक्रमा’ नावाच्या या मोहिमेचा प्रारंभ 29 ऑक्टोबर 2024 रोजी करण्यात आला होता. विशेष म्हणजे, एवढय़ा मोठय़ा प्रवासात मातंगीवर चालक किंवा खलाशी नव्हता.
मातंगीला तांत्रिक भाषेत ‘ऑटोनॉमस सरफेस व्हेईकल’ म्हणजेच स्वयंचलित पृष्ठभागीय नौका म्हणतात. साध्या रिमोट कंट्रोल बोटीपेक्षा ती खूप वेगळी आहे. रिमोट कंट्रोल बोटीला दूर बसलेला माणूस सतत दिशा देतो. मातंगी मात्र आपल्या संगणकीय प्रणालीच्या मदतीने अनेक निर्णय स्वतः घेऊ शकते. तिच्यामध्ये स्वदेशी दिशादर्शन आणि धडक टाळणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे. समुद्रातील परिस्थितीचा अंदाज घेत आपला मार्ग सांभाळणे आणि समोर अडथळा आल्यास त्यानुसार हालचाल करणे या प्रणालीमुळे शक्य होते. सागर डिफेन्सने विकसित केलेल्या ‘जेनिसिस’ या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित स्वयंचलित नियंत्रण तंत्रज्ञानाचा यामध्ये उपयोग करण्यात आला आहे. मुंबईहून निघाल्यानंतर मातंगीने पहिल्या टप्प्यात कारवारपर्यंत सुमारे 600 किलोमीटरचा प्रवास स्वयंचलित पद्धतीने केला आणि पुढे थुथुकुडी गाठले.
अशा नौकेचा उपयोग केवळ एखादा विक्रम करण्यापुरता मर्यादित नाही. हिंदुस्थानला सुमारे साडेसात हजार किलोमीटरची किनारपट्टी लाभली आहे. या विशाल किनारपट्टीवर सतत लक्ष ठेवणे, संशयास्पद नौकांचा शोध घेणे आणि समुद्रातील हालचालींची माहिती मिळवणे यासाठी मानवरहित नौका उपयुक्त ठरू शकतात. ज्या समुद्री भागात मनुष्याला पाठवणे धोकादायक असेल तेथेही अशा नौका काम करू शकतात. गस्त, टेहळणी, माहिती संकलन, शोध आणि बचाव कार्य यांसारखी विविध कामे त्यांच्याकडून करून घेता येऊ शकतात. काही मानवरहित नौकांवर शस्त्र प्रणालीही बसवता येतात. त्यामुळे भविष्यात नौदलाच्या मोठय़ा युद्धनौकांना अशा अनेक छोटय़ा स्वयंचलित नौकांची साथ मिळण्याची शक्यता आहे. एकाच वेळी अनेक मानवरहित नौका परस्पर समन्वयाने काम करू लागल्या तर समुद्रातील युद्धाचे स्वरूपही मोठय़ा प्रमाणावर बदलू शकते.
युक्रेन-रशिया संघर्षाने छोटय़ा मानवरहित समुद्री नौकांचे सामरिक महत्त्व जगासमोर आणले आहे. महागडय़ा आणि मोठय़ा युद्धनौकांसमोर तुलनेने छोटय़ा मानवरहित नौका प्रभावीपणे वापरता येतात हे त्यातून दिसून आले. त्यामुळे अमेरिका, चीनसह अनेक देश आता अशा तंत्रज्ञानावर भर देत आहेत. हिंदुस्थानसाठी मातंगीचे महत्त्व याच पार्श्वभूमीवर अधिक वाढते. विशेष म्हणजे, तिच्या मागे सागर डिफेन्स इंजिनीअरिंग ही पुण्यातील कंपनी आहे आणि या प्रकल्पाला हिंदुस्थानी नौदलाच्या विविध यंत्रणा तसेच संरक्षण मंत्रालयाच्या ‘आयडेक्स’ उपक्रमाचे पाठबळ मिळाले आहे.
विमानांच्या क्षेत्रात ड्रोनने जशी क्रांती घडवली, तशीच क्रांती आता समुद्रात मानवरहित नौका घडवू शकतात. आज मातंगी स्वतः मार्ग शोधत दीड हजार किलोमीटरचा समुद्री प्रवास करते आहे. उद्या अशाच अनेक नौका समुद्रात एकमेकांशी समन्वय साधत देशाच्या किनाऱ्यांवर पहारा देताना दिसू शकतील. भविष्यातील समुद्रात जहाजे असतील, लाटा असतील, मोहिमा असतील; पण प्रत्येक नौकेवर माणूस असेलच असे नाही. या तंत्रज्ञानाचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे, मानवी जीविताचा धोका कमी होणे. समुद्रात वादळ, शत्रूची हालचाल किंवा धोकादायक परिसर असला तरी स्वयंचलित नौका तेथे पाठवता येऊ शकते. त्यामुळे भविष्यात समुद्रावरील देखरेख अधिक वेगवान, सुरक्षित आणि सातत्यपूर्ण होण्याची शक्यता आहे. मातंगीने त्या भविष्याची झलक आजच दाखवून दिली आहे.
Comments are closed.