कापलेली फळे काळी पडू नयेत म्हणून करा हे घरगुती उपाय

शाळेचा टिफीन असो वा ऑफिसचा डबा मध्ये भूक लागल्यावर खाण्यासाठी फळे हा आरोग्यासाठी नेहमीच उत्तम आणि पौष्टिक पर्याय असतो. मात्र,  सफरचंद, केळी किंवा नाशपाती यांसारखी फळे कापून ठेवल्यानंतर काही वेळातच काळी पडतात. हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात आल्यामुळे होणाऱ्या रासायनिक प्रक्रियेमुळे फळांचा रंग बदलतो, ज्यामुळे ती खाण्यायोग्य राहिली आहेत की नाही असा प्रश्न पडतो. जर तुम्हालाही कापलेली फळे ताजी आणि टवटवीत ठेवायची असतील तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. फळे काळी पडू नयेत आणि त्यांचा ताजेपणा कसा टिकवावा याविषयीचे काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय पाहूयात.

फळे का काळी पडतात?

फळे खराब झाली म्हणून ती काळी पडत नाहीत, तर जेव्हा आपण ती कापतो तेव्हा ती हवेतील ऑक्सिजनच्या संपर्कात येतात. ऑक्सिजनसोबत होणाऱ्या रासायनिक प्रक्रियामुळे त्यांचा रंग बदलतो. उष्ण हवामान आणि चुकीच्या पद्धतीने साठवणूक केल्यास ही समस्या आणखी वाढते.

फळे ताजी ठेवण्याचे उपाय

लिंबाचा रस लावा

कापलेल्या सफरचंद, केळी किंवा नाशपातीवर थोडासा लिंबाचा रस लावावा. लिंबातील व्हिटॅमिन सी मुळे फळे काळी पडत नाहीत, परंतु चव बदलू नये म्हणून रस प्रमाणाबाहेर वापरू नये.

हवाबंद डब्यात ठेवा

कापलेली फळे लगेच उघड्यावर ठेवू नये. ती हवाबंद डब्यात ठेवावीत, जेणेकरून फळे हवेच्या संपर्कात कमी येतात आणि काळपट होत नाहीत.

देठाला रॅप लावा

केळी जास्त दिवस ताजी ठेवण्यासाठी आणि ती लवकर काळी पडू नयेत म्हणून त्यांच्या देठाला ॲल्युमिनियम फॉइल किंवा प्लास्टिक रॅप गुंडाळून ठेवावे, यामुळे गॅस बाहेर पडण्याचा वेग कमी होतो.

फ्रीजचा वापर

सफरचंद, द्राक्षे आणि बेरी यांसारखी फळे फ्रीजमध्ये ठेवल्यास ती जास्त काळ टिकतात. थंड तापमानामुळे एन्झाईमची प्रक्रिया मंदावते.

गरजेनुसार कापा

फळे आधीच कापून ठेवणे टाळा. जेव्हा खायची असतील, तेव्हाच ताजी फळे कापावीत.

हेही वाचा – झोपताना उशीची उंची किती असावी?

Comments are closed.