धडक मोर्चाने मुंबई दणाणली, हातात तिरंगा घेऊन जनता रस्त्यावर
विराट… अतिविरत… जिथे दृष्टी जाईल तिथे फक्त आणि फक्त सार्वजनिक व हातात फडकणारा तिरंगा आणि देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात घुमणारी मेघगर्जना. ज्ञानेश कुमार यांना हटवून लोकशाही वाचावी म्हणून हजारोंचा लोकसंख्या आज रस्त्यावर उतरला. मेट्रो सिनेमा ते महापालिका अशा धडक मोर्चाने मुंबई दणाणून गेली.
‘गर्जना’ मोर्चामध्ये शिवसैनिक, मनसैनिकांसह विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते आणि सामान्य जनता सहभागी झाली. मेट्रो सिनेमापासून मोर्चाला सुरुवात झाली. सकाळी 9 वाजल्यापासूनच लोक मेट्रो सिनेमाच्या चौकात जमू लागले. मोर्चात पक्षीय झेंडय़ांऐवजी तिरंगा घेऊन सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याप्रमाणे प्रत्येकाच्या हातात तिरंगा आणि हातात ज्ञानेश कुमार यांच्या विरोधातील फलक दिमाखात झळकले होते. मुंबई, ठाणे, डोंबिवली, कल्याण, नवी मुंबई, पुणे, नाशिकसह राज्यभरातून आलेल्या कार्यकर्त्यांची पावले मोर्चा स्थळी वळत होती. यामध्ये महिला आणि तरुणांची संख्या लक्षणीय होती. मेट्रो, रेल्वेमधून लोक झुंडीने सभास्थळी येताना दिसत होते. ते भ्रष्ट निवडणूक आयोग आणि ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात घोषणाबाजी करत होते. जोरदार घोषणाबाजीने मेट्रो परिसर दणाणून गेला होता. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मेट्रो चौकात आल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाने महापालिकेच्या दिशेने कूच केली. वाजत-गाजत धडक मोर्चा निघाला. केवळ मुंबईच नव्हे, तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो लोक मोर्चात सहभागी झाले. महापालिका मुख्यालयाजवळ आल्यावर मोर्चाचे विराट सभेत रूपांतर झाले.
Comments are closed.