इंडिया अगेन्स्ट व्होट चोर! आज आम्ही फक्त पाऊल उचलले, हक्क हिरावून घेणार असाल तर उद्या हातही उचलावा लागेल, उद्धव ठाकरे यांचा नारा घुमला

‘मतचोरी आणि निवडणूक घोटाळ्याविरुद्धचा लढा हा एका व्यक्तीचा, जातीचा किंवा धर्माचा नाही. हा देशाच्या स्वातंत्र्याचा लढा आहे. सारे काही ओरबाडून घेण्याच्या विरुद्धचा हा लढा आहे. जनतेला याची जाणीव झाली असून संपूर्ण देश ‘इंडिया अगेन्स्ट व्होट चोर’ म्हणत उभा राहिला आहे. त्यामुळे ‘इंडिया अगेन्स्ट व्होट चोर’ ही घोषणा आता गल्लीगल्लीत गेली पाहिजे,’ अशी हाक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिली.

शिवसेना-मनसेच्या ‘गर्जना’ मोर्चाला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी देशातील निवडणूक घोटाळ्यांचे दाखले देत सरकारची लक्तरे काढली. ‘एसआयआरच्या नावाखाली महाराष्ट्रात दोन कोटी मतदार वगळले गेले. तामीळनाडूमध्ये 50 लाख, बंगालमध्ये 30 लाख असे करत-करत देशभरात यांनी 13 कोटी मतदार वगळले. म्हणजेच महाराष्ट्राच्या लोकसंख्येइतके मतदार यांनी देशाच्या यादीतून वगळून टाकले, याकडे उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला लक्ष वेधले. ‘बंगालच्या मतदार यादीतून वगळलेले काही मतदार नंतर वैध ठरले, मात्र त्यांना मतदान करता येणार की नाही यावर सर्वोच्च न्यायालयाने अद्याप निर्णय दिलेला नाही. ‘पोटनिवडणूकच आहे ना घेऊ सुनावणी’ असे म्हणत, तारीख पे तारीख सुरू आहे. 6 ऑक्टोबरला पोटनिवडणूक आहे आणि सुनावणीसाठी 5 ऑक्टोबरची तारीख देण्यात आली आहे. ही सुनावणी होईल की नाही माहीत नाही. सुनावणी होऊन मतदानाची परवानगी दिली तरी या मतदारांना मतदान करता येईल की नाही याची शाश्वती नाही. इतर मतदारांची छाननी होऊन त्याचा निकाल यायला 146 महिने लागणार आहेत. सगळ्या संस्था कशा ढेंगेखाली घेतल्या आहेत याचे हे उदाहरण आहे,’ असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

ज्ञानेश कुमारांची नेमणूकच पक्षपाती

ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीवरच उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेतला. ‘आपल्या देशात राष्ट्रपतींची निवडणूक होते, पण निवडणूक आयुक्ताची होत नाही. त्याला थेट नेमले जाते. हे कसे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. ‘आयुक्तांना नेमणाऱ्या समितीमध्ये याआधी सरन्यायाधीश, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते होते. या सरकारने समितीतून सरन्यायाधीशांना काढून टाकले. त्याऐवजी पंतप्रधानांच्या संमतीने एका मंत्र्याची नेमणूक केली. हे मंत्री अमित शहा आहेत. त्यामुळे या समितीमध्ये निवडणूक आयोगाप्रमाणे दोन विरुद्ध एक असे बहुमत झाले आहे. राहुल गांधी यांनी यास असहमती दर्शवली होती. न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत थांबण्याची विनंती त्यांनी सरकारला केली होती, मात्र सरकार ज्ञानेश कुमारांना नेमून मोकळे झाले. या प्रकरणात न्यायालयाचा निर्णय अजूनही आलेला नाही. केवळ सुनावणी सुरू आहे. बतावणी झालेलीच नाही, असा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला.

…म्हणून आम्हाला ज्ञानेश कुमार नको!

एसआयआर बेकायदा आहे असे केंद्रातील एक सचिव आर. के. सिंह यांनी म्हटले आहे, तर धुलिया नावाच्या एका न्यायाधीशांनी सरकारला बरोबर ‘धुलिया’ आहे. नागरिकत्व रद्द करण्याचा अधिकार निवडणूक आयोगाचा नाही. ज्ञानेश कुमार यांच्या बापालाही तो अधिकार नाही. हा अधिकार गृह मंत्रालयाचा, म्हणजेच अमित शहा यांचा आहे. हा अधिकार ते ज्ञानेश कुमारांच्या माध्यमातून वापरताहेत म्हणून आम्हाला ज्ञानेश कुमार नको आहेत. ज्ञानेश कुमार हे नाव म्हणजे त्या शब्दाचा अपमान आहे. हा अडाणी कुमार आहे. काम आडाणीचेच करतोय. त्याला जनता शिक्षा देईलच, पण त्याच्या सूत्रधारांनाही कायद्याच्या चौकटीत रस्त्यावर खेचल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

अंध भक्तांनो, तुमचंही जातंय!

अमित शहा हे सरदार वल्लभभाई पटेल यांच्याप्रमाणे स्वतःला पोलादी पुरुष म्हणवून घेतात. सरदार पटेल पोलादी पुरुष होते. कारण त्यांनी निजामाच्या हातातून मराठवाडा ताब्यात घेण्यासाठी फौज घुसवली होती, मात्र शहांनी स्वतःच्या पक्षाला जिंकवण्यासाठी एका महिलेच्या विरोधात बंगालमध्ये फौजा घुसवल्या. यांना कसले पुरुष म्हणायचे ते आधी शोधावे लागेल, असा बोचरा टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला. ‘महिलेच्या विरोधात एका राज्यात फौजा घुसवता ही तुमची लोकशाही आहे? असली दळभद्री लोकशाही आम्ही मानत नाही,’ असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले. ‘देशात जे काही चालले आहे, त्यामुळे माझे काय जाते, असे अंधभक्तांना वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. तुमचंही जातंय, तुमचंही नुकसान होतंय, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

देश ज्ञानेश कुमारच्या बापाचा आहे का?

‘राज्यातील मतदार वैध की अवैध हे ठरवण्याचा अधिकार स्थानिक पातळीवरील निवडणूक अधिकाऱ्यांना नाही. तो केंद्राकडे आहे. इथले बीएलओ, बीएलए, एलबीडब्ल्यू यांना काहीच अर्थ नाही. सगळे काही ज्ञानेश कुमार ठरवणार. देश काय ज्ञानेश कुमारच्या बापाचा आहे का? अधिकाराचे आम्ही समजू शकतो, पण मनमानी खपवून घेणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

गद्दार नेहमी जोरात बोंबलतात!

मतदार यादीतून वगळल्या गेलेल्यांना सरकारी सुविधा देणार नाही असे वक्तव्य पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी केले आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली. ‘मतदार यादीतून वगळल्या गेलेल्या 13 कोटी लोकांचे तुम्ही रेशन बंद करणार आहात का? मग देशातल्या 80 कोटी लोकांना मोफत रेशनचा जो डंका तुमचे सरकार पिटते त्याचे काय होणार, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी केला. ‘हे सुवेंदू अधिकारी तिथले गद्दार आहेत. गद्दार नेहमी जोरात बोंबलतात. आमच्याकडचेही त्यातलेच आहेत,’ असा टोला त्यांनी हाणला.

तुमचे पोलीस झटके मारतात का?

‘भाजपला सरकार चालवताच येत नाही. ज्या पद्धतीने ते सरकार चालवत आहे त्याला सूड उगवणे म्हणतात. कायदा-सुव्यवस्था संपूर्ण ढासळली आहे. ठाण्यात आमच्या पुर्णेकरांची हत्या झाली. तुमचे पोलीस काय झक मारतायत का? गृहमंत्री आहेत कुठे? देशभर महिलांवर अत्याचार होत आहेत. कुठे आहे तुमचे हिंदुत्ववादी सरकार? हे तुमचे हिंदुत्व आहे,’ असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

जिजाबाई कचाटे यांची व्यथा

राज्य सरकारच्या उदासीन कारभारावर आसूड ओढताना उद्धव ठाकरे यांनी जिजाबाई कचाटे या शेतकरी महिलेची व्यथा मांडली. ‘महाराष्ट्रात दुष्काळ पडला आहे. कल्पना करता येणार नाही अशी अन्नदात्याची परिस्थिती आहे. शेतकरी कसेबसे जगत आहेत. जिजाबाई कचाटे यांनी शेतात सोयाबीन पेरले होते, ते वाया गेले. मिरची, मका हातातून गेला. डोक्यावर कर्ज झाले. बँकांनी तगादा लावला. त्यातून जिजाबाईंच्या मुलाने शेतातच आत्महत्या केली. तिथेच त्याला अग्नी दिला गेला. तिचे दुःख एवढेच नाही. जेव्हा वारा येतो तेव्हा मुलाच्या चितेची राख माझ्या घरादारावर पसरते, असे ती सांगते. काळीज पिळवटून टाकणारे हे दुःख आहे. पण तिकडे या सरकारमधले कोणी जात नाही, असा संताप उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

हिटलरच्या अंतानंतर न्यूरेंबर्ग ट्रायल्स झाली. जे अधिकारी हिटलरच्या पापात सहभागी होते त्या सगळ्यांना शोधून काढण्यात आले, त्यांच्यावर खटले भरण्यात आले. काहींना फासावर लटकवलं. काही लोक तुरुंगात सडून गेले. तोच क्षण उद्या आपल्या देशात आल्याशिवाय राहणार नाही. एवढं भाजप आणि त्यांच्या तालावर चालणाऱ्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावंब

‘मेक इन इंडिया’ वगैरे ठीक आहे. पण त्याच्या नावाखाली देशात हुकूमशहा बनणार असतील तर त्यांना गाडून टाकण्यासाठी आम्ही उभे राहिलो आहोत. अजूनही वेळ गेलेली नाही. आज लोक उठलेत, उद्या पेटले तर तुमचे सिंहासन जळून खाक केल्याशिवाय राहणार नाहीत.

आता लोकांना सरकारच्या बाजूने बोलण्याची भीती वाटते

‘एक काळ असा होता की लोकांना या सरकारच्या विरुद्ध बोलायला भीती वाटत होती. आता त्यांच्या बाजूने बोलण्याची भीती वाटते. कारण सरकारच्या बाजूने बोलले तर खाडकन कानाखाली पडू शकते असे लोकांना वाटते. ही भीती आपण वाढवली पाहिजे, असे उद्धव ठाकरे म्हणाले. ‘तुमचा पक्ष इतका मोठा आहे. तुम्ही इतके चांगले काम केले आहे तर आजपर्यंत कुठल्याही पंतप्रधानाला पडल्या नाहीत तेवढय़ा शिव्या आजच्या पंतप्रधानांना का पडताहेत, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी भाजपला केला.

ज्ञानेश कुमार हे हत्यार

‘हे सरकार फक्त मतचोरी करत नाही. राम मंदिरातील दानपेटी चोरणारे हे निर्घृण गुन्हेगार आहेत. पक्ष चोरणारे षंढ आहेत. 45 लाख मतदार वाढले यात यांचे काही कर्तृत्व नाही. यांनी हे सगळे कागदावर केले आहे. ज्ञानेश कुमार हे त्यांचे हत्यार आहे. ज्ञानेश कुमारांची नेमणूक पक्षपाती आहेच, पण त्यांना पंतप्रधान, राष्ट्रपतींपेक्षाही जास्त संरक्षण देऊन ठेवले आहे. निवृत्त झाल्यानंतरही त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकणार नाही असे संरक्षण आहे. ही कोणती लोकशाही आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

वगळलेल्या दोन कोटी मतदारांमध्ये बांगलादेशी किती ते जाहीर करा!

बांगलादेशींना शोधून काढण्यासाठी एसआयआर राबवला जात आहे असे कारण सरकारकडून दिले जात आहे. त्याचा उद्धव ठाकरे यांनी समाचार घेतला. ‘बांगलादेशींना शोधून काढण्याचा उद्देश असेल तर आतापर्यंत दोन कोटी मतदार वगळले त्यात किती बांगलादेशी होते हे आम्हाला सांगा. त्यांना हाकलून देण्याची, सीमेवर पोहोचवण्याची जबाबदारी आम्ही घेतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. मुळात सीमा तुमच्या हातात असताना बांगलादेशी देशात आलेच कसे आणि त्यांना राहू कोणी दिले, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. बांगलादेशींच्या नावाखाली आमचा मतदानाचा अधिकार काढून घेतला जाणार असेल तर आज पाऊल उचलले आहे, उद्या हात उचलावा लागेल, असा सणसणीत इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.

देशात 2014 पासून भ्रष्ट कालखंड ः बाळासाहेब थोरात

निवडणूक आयोगाविरोधात महाप्रचंड मोर्चा आज निघालाय. आपल्या मतांची चोरी होतेय, हे जनतेला आता समजले आहे. राहुल गांधी यांनी हे अनेकदा पुराव्यानिशी सांगितले. आता तर निवडणूक आयोगातील दोन निवडणूक आयुक्तांनीच हे सांगितले आहे. भाजप सत्तेसाठी काहीही करेल. मतांच्या चोरीतून भाजपने हा विजय मिळवला आहे. पुण्यात एमपीएससीची हजारो मुले रस्त्यांवर आंदोलनाला बसली आहेत. ज्यांनी मतांची चोरी केली, ते आता नोकऱ्या हिरावून घेण्याचे काम करत आहेत. ज्ञानेश कुमार त्यांच्या भ्रष्ट कारभाराचे प्रतीक आहे.  2014 पासूनचा काळ हा भारताचा इतिहासात काळा कालखंड म्हणून ओळखला जाईल. तो आपल्याला दुरुस्त करायचा आहे. पुन्हा एकदा लोकशाहीची, राज्य घटनेची प्रतिष्ठा जपायची आहे. आपल्या सगळ्यांना संघर्ष करावा लागेल. लोकशाही वाचवण्याची ऐतिहासिक जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे, असे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

निवडणूक आयोग भाजपची कठपुतली ः अनिल देशमुख

देशात मतदार याद्यांमध्ये घोळ होत आहेत. लोकांची नावे कापण्यात येत आहेत. एकप्रकारे मोठा रोष संपूर्ण देशामध्ये आहे. निवडणूक आयोगाला हाताशी धरून निवडणूक जिंकण्याचे काम सुरू आहे. भाजपची कठपुतली बनलेल्या ज्ञानेश कुमारांनी किंवा त्यांच्या आधीच्या राजीव कुमार यांनी खूप गडबडी केल्या. महाराष्ट्र, गोवा, पश्चिम बंगालमध्ये घोटाळे केले. याविरोधात मोठा आक्रोश देशभरात आहे. दिल्लीचे आंदोलन असो किंवा 2 ऑक्टोबरचे छत्रपती शिवाजी महाराज पार्कमधील आंदोलन असो, मोठय़ा प्रमाणात सरकारविरोधात आवाज उठत आहेत. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांच्यावर एफआयआर दाखल करा, त्यांना जेलमध्ये टाका आणि पुढील निवडणुका बॅलेट पेपरवर घ्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी केली.

महाराष्ट्राच्या भूमीतून हुकूमशहाचा पराभव होईल ः शशिकांत शिंदे

हा विराट जनसमुदाय बघितला की वाटतंय हुकूमशहाचा पहिला पराभव महाराष्ट्राच्या क्रांतीभूमीतून होईल. जे कधी लढले नाहीत, ते हुकूमशाही गाजवायचे काम करत आहेत. निवडणूक जिंकल्यावर आमदार व खासदार फोडू शकतो, हा अहंपणा त्यांच्यामध्ये आणि  त्यांच्या मित्रपक्षांमध्ये आहे. ही लढाई निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात आहे. या लढाईत निवडणूक आयोगाचे भाजप समर्थन करत आहे. काही दिवसांपूर्वी जाहीर केले की, तब्बल दोन कोटी लोकांची नावे बोगस नोंदवली गेली आहेत. मग या लोकांनी विधानसभेला मतदान केले, त्याचे काय करणार? महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र आज रस्त्यावर उतरलो आहोत. महाराष्ट्र ही क्रांतीची भूमी आहे. लोकशाही टिकावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान टिकवायचे असेल तर मतपत्रिकेवर मतदान झाले पाहिजे, अशी मागणी करावी लागली तरच क्रांती होईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.

ज्ञानेश कुमारांना हटवा ः सुभाष लांडे

जनता आज मोठय़ा संख्येने इथे आली आहे. खरे म्हणजे जनता भाजपच्या विरोधात असताना त्यांचा विजय कसा होतो. मोदी-शहांनी ज्ञानेश कुमारांसारखे अधिकारी केंद्रीय यंत्रणेवर बसवले आहेत. ज्ञानेश कुमारांना हटवल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, अशी भूमिका भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते सुभाष लांडे यांनी मांडली.

न्यायसंस्था तुम्ही ताब्यात घेतली असेल, प्रशासन ताब्यात घेतलं असेल, आणखी काही संस्था तुम्ही ताब्यात घेतल्या असतील, पण हे रस्ते जनतेच्या मालकीचे आहेत. या रस्त्यावर फिरणं उद्या तुम्हाला मुश्कील होऊन जाईल.

Comments are closed.