एरोस्पेस क्षेत्रात भारताचे टेकऑफ; लॉकहीडची प्रमुख योजना
अमेरिकेच्या कंपनीचा उत्पादन प्रकल्प उभारण्याची योजना : 48 विमाने भारतात निर्माण करण्याचा प्रस्ताव
अमेरिकेची एअरोस्पेस कंपनी लॉकहीड मार्टिन भारतात सैन्य विमानांच्या निर्मितीचा विस्तार करण्याच्या तयारीत आहे. भारतीय सशस्त्र दलांसाठी 60 मध्यम वाहतूक विमानांच्या खरेदीच्या सुमारे 10.5 अब्ज डॉलर्सच्या निविदेत कंपनी सहभागी झाली आहे. या निविदेत यश मिळाल्यास भारतातील उत्पादन क्षमता मोठ्या प्रमाणात वाढवण्याचा कंपनीचा प्रस्ताव आहे.
वृत्तसंस्था, नवी दिल्ली
लॉकहीड मार्टिनच्या प्रस्तावानुसार एकूण 60 सी-130जे सुपर हर्क्युलिस विमानांपैकी 12 विमाने तयार अवस्थेत भारताला दिली जातील, तर उर्वरित 48 विमाने भारतातच निर्माण करण्याची योजना आहे. याकरता कंपनीची टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेडसोबतची भागीदारी अधिक विस्तारली जाणार आहे.
टाटासोबत सी-130चे विमानांच्या भागांचे आणि एम्पेनेज म्हणजेच विमानांच्या शेपटाच्या संरचनेचे उत्पादन करण्याचा आधीपासून अनुभव आहे. या क्षमतेचा भारतात आणखी विस्तार करण्याचा विस्तार असल्याचे लॉकहीड मार्टिन कंपनीचे उपाध्यक्ष डॅन टेनी यांनी सांगितले आहे.
भारतात तयार होणार सी-130जे उत्पादन नेटवर्क
भारत आणि लॉकहीड मार्टीन यांच्यात सी-130 जे संदर्भात आधीपासून औद्योगिक सहकार्य आहे. हैदराबादमधील टाटा-लॉकहीड मार्टिन एअरोस्ट्रक्चर्सकडून सी-130जे विमानाच्या शेपटाच्या संरचनेसह विविध एअरोस्ट्रक्चर घटक तयार केले जातात. भविष्यात हे उत्पादन अन् जुळवणीचे काम आणखी वाढविले जाण्याची शक्यता आहे. लॉकहीड मार्टिनने भारतात सी-130जे साठी एमआरओ म्हणजेच देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉल सुविधा उभारण्याच्या दिशेनेही पाऊल टाकले आहे. बेंगळूर येथे उभारल्या जाणाऱ्या सुविधेमुळे भारतीय तंत्रज्ञ आणि अभियंत्यांना विमान देखभाल आणि तांत्रिक कौशल्य विकसित करण्याची संधी मिळणार आहे.
72 विमानांचा संभाव्य समान ताफा
लॉकहीड मार्टिनने आणखी एक प्रस्ताव मांडला आहे. भारतीय वायुदलाकडे सध्या 12 सी-130जे विमाने आहेत. ही विद्यमान 12 विमाननेही नव्या प्रगत कॉन्फिगरेशनमध्ये अपग्रेड करण्याचा प्रस्ताव कंपनीने दिला आहे. नवीन 60 विमाने आणि विद्यमान 12 विमानांचे अपग्रेडेशन झाले, तर भारतीय वायुदलाकडे एकाच कॉन्फिगरेशनची 72 सी-130जे विमानांची क्षमता तयार होऊ शकते.
भारतासाठी प्रकल्पाचे महत्त्व
लॉकहीड मार्टिनसोबत कार झाल्यास हे केवळ विमानांची खरेदी न ठरता भारतातील एअरोस्पेस उत्पादन क्षमता, पुरवठासाखळी, कौशल्य विकास आणि संरक्षण क्षेत्रातील स्थानिक उत्पादन यांना चालना मिळू शकते. भारतीय कंपन्या आणि जागतिक विमान उत्पादक यांच्यातील भागीदारीमुळे भविष्यात विमानांचे काही भाग, एअरोस्ट्रक्चर, देखभाल-दुरुस्ती आणि संभाव्य असेंब्लीचे काम भारतात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा प्रकल्प भारताच्या संरक्षण-एअरोस्पेस उत्पादन क्षेत्रासाठी महत्त्वाचा औद्योगिक टप्पा ठरू शकतो.
निविदेत कोणत्या भारतीय कंपन्या?
या महत्त्वाच्या संरक्षण प्रकल्पासाठी भारतीय कंपन्यांना परदेशी विमान उत्पादकांसोबत भागीदारी करावी लागणार आहे. स्पर्धेत असलेल्या प्रमुख भारतीय कंपन्या खालीलप्रमाणे आहेत..
?टाटा अॅडव्हान्स्ड सिस्टीम लिमिटेड- लॉकहीड मार्टिनसोबत
?महिंद्रा डिफेन्स- ब्राझीलच्या एम्ब्राएरसोबत
?अदानी डिफेन्स अँड एअरोस्पेस
?हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड
?रिलायन्स डिफेन्स
सरकारच्या निविदा प्रक्रियेत भारतीय कंपनीने परदेशी मूळ विमान उत्पादकाशी भागीदारी करून भारतात उत्पादन आणि देखभाल व्यवस्था उभारण्यावर भर दिला आहे.
Comments are closed.