पालघरमध्ये भातशेती करपली; दुष्काळाचे सावट, पावसाने ओढ दिल्याने बळीराजा हवालदिल

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पालघर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवल्याने भातशेतीवर मोठे संकट ओढवले आहे. ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा अत्यल्प पाऊस झाल्याने पालघर जिल्ह्यातील तलासरी, बोईसर, वाडा येथील भाताची पिके अक्षरशः करपून गेली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. उन्हाच्या तडाख्याने जमिनीला मोठ्या भेगा पडू लागल्या असून पावसाची प्रतीक्षा करता करता कणसाला आलेली भाताची रोपे पिवळी पडून वाळू लागल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.

जून महिन्यात पावसाने चांगलीच सुरुवात केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने भाताची लागवड करायला सुरुवात केली. मात्र जुलै महिन्यामध्ये एकाच महिन्यात झालेला पाऊस वगळता ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये पावसाने पाठ फिरवली. भात पिकाच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पाण्याची गरज असताना पाऊस गायब झाल्याने शेतातील रोपे पिवळी पडून वाळू लागली आहेत. काही ठिकाणी तर भाताची पिके अक्षरशः करपली आहेत.

नुसत्या घोषणा नको, मदतीचा हात द्या!

पालघरच्या ग्रामीण भागातील हजारो शेतकरी खरीप भात पिकावर अवलंबून आहेत. मात्र पीक ऐन भरात असतानाच पावसाअभावी यंदाचा हंगाम हातातून जाण्याची चिन्हे आहेत. त्यातच नुकत्यात जाहीर झालेल्या सरकारच्या सवलतीच्या यादीत ठाणे आणि पालघर जिल्ह्याचा समावेश झालेला नाही. त्यामुळे पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून अधिकाऱ्यांनी एसी कॅबिनमधून बाहेर पडून तातडीने प्रत्यक्ष जमिनीवर जाऊन पिकांचे पंचनामे करावेत आणि अधिकृत दुष्काळ घोषित करून तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.

संकटांची मालिका

पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या हंगामात सुरुवातीपासूनच नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागत आहे. अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेती, घरे, फळबागा आणि शेतीशी संबंधित मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्यातच ३० सप्टेंबर रोजी झालेल्या वादळामुळे अनेक भागांतील घरांचे नुकसान झाले असून आंब्याच्या बागांसह विविध पिकांनाही फटका बसला आहे. या संकटातून सावरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच आता पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे राहिले आहे.

कर्जाचा डोंगर, उत्पन्नाची आशा मावळली

भातशेतीसाठी शेतकऱ्यांनी बियाणे, खते, मजुरी आणि इतर खर्चासाठी हजारो रुपये खर्च केले. मात्र पावसाने दगा दिल्याने हा संपूर्ण खर्च वाया जाण्याची भीती आहे. हातात पीक नसताना कर्ज कसे फेडायचे, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांपुढे ठाकला आहे.

Comments are closed.