ऑक्टोबर हीट वाढतेय! वीज बिल न वाढवता घर कसं ठेवाल थंड?

पावसाळा संपून हिवाळा सुरू होण्यापूर्वीच्या दिवसांमध्ये वातावरणात अचानक मोठा बदल होतो. पाऊस कमी झाल्यामुळे हवेत दमटपणा आणि उकाडा वाढतो, ज्याला आपण ऑक्टोबर हीट असं म्हणतो.. या दिवसांत कडक ऊन आणि दमट हवामानामुळे घाम येणे, अस्वस्थ वाटणे आणि घरात राहणे सुद्धा कठीण होते. अशावेळी घरातला उकाडा कमी करण्यासाठी दिवसभर एसी किंवा पंखे सुरू ठेवावे लागतात, ज्यामुळे वीज बिलात प्रचंड वाढ होते. मात्र, काही सोप्या उपायांचा अवलंब करून घर नैसर्गिकरीत्या थंड ठेवता येऊ शकते.

पडदे आणि खिडक्या

कडक ऊन सुरू होण्यापूर्वीच घरातील खिडक्या आणि दरवाजे बंद करून त्यावर जाड पडदे किंवा ब्लॅकआउट कर्टन्स लावता येतील. यामुळे बाहेरची उष्ण हवा आणि सूर्यप्रकाश घरामध्ये प्रवेश करणार नाही. संध्याकाळी जेव्हा हवा थोडी थंड होईल, तेव्हा खिडक्या उघडून घरातील हवा खेळती ठेवू शकता.

क्रॉस व्हेंटिलेशन

दमट आणि उष्ण हवा बाहेर जाण्यासाठी क्रॉस व्हेंटिलेशन गरजेचे आहे. यासाठी घरातील विरुद्ध दिशेच्या खिडक्या उघड्या ठेवा, जेणेकरून ताजी हवा आत येईल आणि उष्णता बाहेर जाईल.

इनडोअर रोपे

तापमान नैसर्गिकरीत्या कमी करण्यासाठी मनी प्लांट, स्नेक प्लांट किंवा अरेका पाम यांसारखी इनडोअर रोपे लावावीत. ही रोपे वातावरण थंड करतात.

हलके रंग

घराच्या भिंतींना शक्यतो पांढरा किंवा फिकट पिवळा, हलका निळा यांसारखे फिकट रंग द्यावेत. हे रंग उष्णता शोषून घेण्याऐवजी ती परावर्तित करतात, ज्यामुळे घर जास्त तापत नाही.

एक्झॉस्ट फॅन

स्वयंपाक करताना किंवा बाथरुममध्ये वाफेमुळे उष्णता वाढते. अशा वेळी किचन आणि बाथरुममधील एक्झॉस्ट फॅन सुरू ठेवा, जेणेकरून घरातील गरम हवा आणि दमटपणा बाहेर निघून जाईल.

या सोप्या उपायांच्या मदतीने तुम्ही ऑक्टोबर हीटच्या कडक उन्हातही तुमचे घर थंड ठेवू शकता.

हेही वाचा – कापलेली फळे काळी पडू नयेत म्हणून करा हे घरगुती उपाय

Comments are closed.