शहापुरातील संतापजनक घटना, पाण्यासाठी आंदोलन करणाऱ्या महिलांवर उपसरपंचाने खुर्ची उगारली

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

पाण्यासाठी पंचायत समितीवर आंदोलन करणाऱ्या आदिवासी महिलांवर मुसई ग्रामपंचायतीचे उपसरपंच गणपत कुडव यांनी थेट खुर्ची उगारल्याची संतापजनक घटना आज घडली. या प्रकाराचा ग्रामीण भागातून तीव्र शब्दांत निषेध करण्यात येत आहे. दरम्यान मुजोर सरपंच कुडव यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली आहे. आंदोलनकर्ते ग्रामस्थ व महिलांवर दादागिरी करीत त्यांना धमकवण्यात आले. तरीही पाण्यासाठी हंडा डोक्यावर घेऊन ठिय्या मांडण्यात आला.

शहापूर तालुक्यातील मुसई कातकरीवाडी येथील आदिवासी नागरिकांना गेल्या चार महिन्यांपासून पाण्यासाठी अक्षरशः वणवण करावी लागत आहे. पाण्यासाठी आक्रोश करणाऱ्या महिलांनी आज पंचायत समिती गाठून ठिय्या मांडला. कातकरीवाडीला तातडीने टँकर सुरू करावा किंवा कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी जोरदार मागणी त्यांनी केली. मात्र सरपंच गणपत कुडव यांनी आदिवासींवर थेट खुर्ची उगारली. तरीही मागे न हटता आंदोलन करण्यात आले.

आजपासून पुरवठा करणार

ठिय्या आंदोलन आणि संतापलेल्या ग्रामस्थांचे रौद्ररूप बघून प्रशासन हादले आणि उद्यापासून पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. त्यानंतर संतप्त महिलांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी माजी उपसरपंच वसंत भोईर, माजी सदस्य यशवंत कुडव, माजी सदस्या अलका भोईर यांसह आदिवासी महिला व ग्रामस्थ उपस्थित होते.

Comments are closed.