IND vs WI: वैभव सूर्यवंशी आजच्या सामन्यात खेळणार नाही? भारतीय प्रशिक्षकांनीच दिली हिंट

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी२० मालिका आजपासून (मंगळवार, ६ ऑक्टोबर) खेळली जाणार आहे. लखनऊमध्ये पहिला सामना खेळला जाणार असून यामध्ये युवा स्टार फलंदाज वैभव सूर्यवंशी खेळणार की नाही, याबाबतचे महत्त्वाचे अपडेट्स भारतीय प्रशिक्षकांनी दिले आहेत.

भारताची टी२० संघ नुकतेच आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून परतला आहे. त्या स्पर्धेत खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानविरुद्धच्या अंतिम अकरामध्ये वैभव, संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या तिघांनाही खेळवले होते. यामुळे हेच कॉम्बिनेशन विंडीजविरुद्धच्या मालिकेत असणार, असा अंदाज व्यक्त केला होता. त्याला मात्र भारतीय गोलंदाजी प्रशिक्षक मॉर्ने मॉर्कल यांच्या वक्तव्याने ब्रेक लागला आहे.

पहिल्या सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत मॉर्केल यांना वैभव विंडीजविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यासाठी अंतिम अकरामध्ये असणार का विचारले गेले. त्यावर ते म्हणाले, मला खात्री आहे की, गौतम संघात बदल करेल. म्हणजे, मी म्हटल्याप्रमाणे, पुढील विश्वचषकात भारताला सामना जिंकण्यासाठी सर्वोत्तम संघ कोणता असेल, हे सर्वस्वी निवड समिती, प्रशिक्षक आणि कर्णधार यांच्यावर अवलंबून आहे. तेच त्यांचे मुख्य ध्येय आहे.

आताच आमचे खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धा खेळून परतले आहेत. प्रवासामुळे ते थकले असून प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल दिसू शकतात, असे मॉर्केल यांनी पुढे म्हटले आहे.

मॉर्केल यांनी वैभवबाबत म्हटले, आपल्या सर्वांना त्याची प्रतिभा माहित आहे. माझ्या मते, तो जितका वेळ या दर्जेदार खेळाडूंसोबत या वातावरणात घालवेल, जितका वेळ तो या स्तरावर सराव करेल, ते त्याच्यासाठी उत्तम ठरेल. आणि जर त्याला खेळण्याची संधी मिळत नसेल, तरीही तो बसमध्ये, डगआऊटमध्ये किंवा हॉटेलमध्ये खूप अनुभवी खेळाडूंसोबत असतोच.

वैभवची भारतासाठी टी २० कामगिरी पाहिली तर त्याने आतापर्यंत ८ सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने ३०.७५ च्या सरासरीने २४६ धावा केल्या आहेत. तसेच तो झिम्बाब्वे दौऱ्यात मालिकावीरही ठरला होता. (Will Vaibhav Sooryavanshi play today? Indian Bowling Coach Morne Morkel Gives Updates, INDvsWI 1st T20I Match)

Comments are closed.