विंडीजच्या 250 धावांच्या धक्क्यानंतर गंभीरची भारतीय गोलंदाजांबद्दल सहानुभूती! म्हणाला, “त्यांचे करिअर धोक्यात…”
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दुसरा टी 20 सामना शुक्रवारी (9 ऑक्टोबर) खेळला गेला, जो वेस्ट इंडीजने 6 विकेट्सने जिंकला. यामध्ये झालेली भारतीय गोलंदाजांची धुलाई पाहून भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी सहानुभूती व्यक्त केली. तसेच त्यांनी फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये संतुलन राखण्याचे आव्हान केले.
जेसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम कॉम्प्लेक्स, रांचीमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात वेस्ट इंडीजने 250 धावसंख्येचे लक्ष्य सहज पार केले. दाट दवाचा परिणाम या सामन्यावर झाला. दवामुळे या खेळपट्टीवर चुकीला फार कमी वाव आहे, आणि कोणताही चेंडू जर तुम्ही नीट टाकला नाही, तर तो थेट प्रेक्षकांमध्ये जात होता. त्यामुळे विंडीजच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची यथेच्छ धुलाई केली.
विंडीजचा कर्णधार शाय होपने तर नाबाद शतकी खेळी केली. त्याने 45 चेंडूंत 102* धावा केल्या. त्याच्या या वादळी खेळीमुळे पाहुण्या संघाने सहा विकेट्स आणि 9 चेंडू शिल्लक राखून सामना जिंकला.
लक्ष्याचा पाठलाग करण्यास उतरलेल्या विंडीजचा भारतीय वेगवान गोलंदाज मयंक यादवने चकित केले. त्याने पहिल्याच षटकात कामिल पूरन आणि शिमरॉन हेटमायर यांना एकापाठोपाठ बाद केले. त्यानंतर होपने शेर्फेन रदरफोर्ड आणि रोमारियो शेफर्डच्या साथीने विंडीजचा डाव सांभाळला आणि मालिका 1-1 अशी बरोबरीत केला.
याआधी झालेल्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडीजने दिलेले 406 धावसंख्येचे लक्ष्य भारताने सहज गाठले होते. तेव्हा गंभीरने सपाट खेळपट्टीबाबत टीका केली होती. त्यांनी म्हटले होते की, ‘तो क्रिकेट नव्हता, निव्वळ फलंदाजी होती.’
रांचीच्या सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत गंभीरला विचारले गेले की संघ व्यवस्थापनाला फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये अधिक चांगली स्पर्धा पाहायला आवडेल का? यावर गंभीरने म्हटले, “फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये चांगली स्पर्धा कोणाला नको असते? तुम्हाला केवळ चौकार-षटकार पाहायचे असतील, तर आम्हालाही पाहायचे आहे. तुम्हाला जर बरोबरीची स्पर्धा हवी असेल, तर आम्हालाही तसेच हवे आहे, कारण ते आमचेही गोलंदाज आहेत”
“हे गोलंदाज आपलेच आहेत. त्यांची कारकीर्दही पणाला लागलेली आहे. या ड्रेसिंग रूममध्ये स्थान मिळवण्यासाठी त्यांनीही खूप मेहनत घेतली आहे; असे नाही की त्यांनी कष्ट घेतले नाहीत. त्यांनीही कठोर परिश्रम केले आहेत. त्यामुळे जर स्पर्धा समसमान असेल, तर ते चांगले ठरेल आणि आपल्याला अधिक चांगले क्रिकेट पाहायला मिळेल,” असेही गंभीरने पुढे म्हटले आहे.
भारत विरुद्ध वेस्ट इंडीज तिसरा टी 20 सामना 11 ऑक्टोबर रोजी इंदौर येथे खेळला जाणार आहे. (After Windies chased down 250 runs in 2nd T20I vs IND, Gautam Gambhir sympathized with Indian bowlers, says, “their careers are also at stake”)
Comments are closed.