बेवारस गाड्यांनी रस्ते बळकावले, उल्हासनगरमध्ये 20 वाहनांवर वाहतूक पोलिसांनी चिकटवल्या कारवाईच्या नोटीसा
शहरातील रस्ते म्हणजे आपलीच खासगी मालकीची जागा अशा अविर्भावात महिनोनमहिने गाड्या पार्क करून त्याकडे ढुंकूनही न पाहणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. शहाड रेल्वे स्थानक ते म्हाळस नाका या परिसरात राऊंडअप करून पोलिसांनी २० गाड्यांवर कारवाईच्या नोटीसा चिकटवल्या. मुदतीच्या आत गाड्या हटवाव्यात अन्यथा त्या टोईंग करून कारचालकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराच वाहतूक पोलिसांनी दिला आहे.
शहरातील प्रमुख रस्त्यांवर गाड्या पार्क करून त्याकडे महिनोनमहिने न फिरकणाऱ्या वाहनचालकांमुळे उल्हासनगरात वाहतूककोंडीला तोंड द्यावे लागते. ही समस्या लक्षात घेऊन वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज सरनौबत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गोरख चौधरी, पोलीस हवालदार नाना आव्हाड, पोलीस नाईक भारत खाडेकर, महानगरपालिका मुकादम संतोष काळे, भगवान हंबलकर यांनी बेवारस व अनधिकृतपणे उभ्या असलेल्या वाहनांविरोधात संयुक्त मोहीम हाती घेतली. यावेळी एकाच ठिकाणी महिनोनमहिने उभ्या असलेल्या २० गाड्यांची नोंद करून त्यावर कारवाईच्या नोटीसा चिकटवण्यात आल्या.
Comments are closed.