“माझ्या परवानगीशिवाय…”, शिखर धवन 'या' लीगवर भडकला, कायदेशीर कारवाईचा दिला इशारा

भारताचा माजी सलामीवीर शिखर धवन याचे नाव त्याच्या परवानगीशिवाय एका लीगमध्ये सामविष्ट करण्यात आले आहे, ज्यामध्ये पाकिस्तानी खेळाडूही आहेत. धवनचे नाव वर्ल्ड टी२० कॉन्टिनेंट कपमधील एशिया वॉरियर्स संघात सामील केले आहे. यामध्ये त्याच्यावर नेतृत्वाची जबाबदारी देण्यात आली.

या संघात धवनबरोबर राहुल शर्मा, गुरकीरत सिंग मान आणि अभिमन्यू मिथुन यांचेही नाव होते. त्याच संघात सोहैब मकसूद, इफ्तिखार अहमद, सोहेल तन्वीर आणि उस्मान कादिर हे पाकिस्तानी खेळाडूही होते.

धवनचे नाव पाकिस्तानी खेळाडू असलेल्या एका लीगच्या संघात असल्याचे कळताच चाहत्यांना मोठा धक्का बसला. भारत आणि पाकिस्तान यांच्यात मागील अनेक वर्षांपासून राजकिय संबंध ठिक नाहीत. २०२५ मधील ऑपरेशन सिंदूर दरम्यान धवनने पाकिस्तानविरोधात ठाम भूमिका घेतली होती. आता त्याचे नाव त्याच्या परवानगीशिवाय वापरल्याने त्याने जाहीरपणे निषेध व्यक्त केला आहे.

धवनने आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवर लिहिले, “‘वर्ल्ड टी-२० कॉन्टिनेंट कप’मध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंच्या यादीत माझे नाव असल्याचे माझ्या निदर्शनास आले आहे. माझ्या संमतीशिवाय किंवा मला कोणतीही कल्पना न देता आयोजकांनी माझ्या नावाचा वापर केला आहे आणि यासंदर्भात माझा संघ योग्य ती कायदेशीर पावले उचलणार आहे.”

“मी प्रसारमाध्यमे आणि माझ्या चाहत्यांना विनंती करतो की, त्यांनी कोणत्याही अनधिकृत घोषणांवर विश्वास ठेवू नये किंवा त्याबाबतच्या बातम्या देऊ नयेत. तुमच्या अखंड प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद,” असेही धववने पुढे लिहिले आहे.

धवनने भारतासाठी अनेक सामन्यांमध्ये महत्त्वाची कामगिरी केली आहे. तो आंतरराष्ट्रीय स्तरावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक यशस्वी ठरला. त्याने १६७ सामन्यांमध्ये ४४.१ च्या सरासरीने ६७९३ धावा केल्या. यामध्ये त्याने १७ शतके आणि ३९ अर्धशतकी खेळी केल्या. धवनने ३४ कसोटी सामनेही खेळले. यामध्ये त्याने ७ शतके आणि पाच अर्धशतकांच्या सहाय्याने २३१५ धावा केल्या.

धवन आता प्रो स्टार लीगमध्ये दिसणार आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यात सुरू होईल. याची सुरूवात श्रीनगरमध्ये होईल, तर अंतिम सामना डेहराडूनमध्ये खेळला जाणार आहे. (Shikhar Dhawan Warns Legal Action After World T20 Continent Cup uses his name In Team With Pakistan Players says without my permission)

Comments are closed.