देशासाठी पुनरागमन करण्याचे स्वप्न अजूनही जिवंत! निवडकर्त्यांवर नाराजी, उमेश यादवने व्यक्त केली खंत
हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज उमेश यादव मागील अनेक वर्षांपासून संघातून बाहेर आहे. दुखापतीतून सावरत उमेश यादव देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या गोलंदाजीची छाप पाडताना दिसत आहे. वयाच्या 39 व्या वर्षात पाऊल टाकताना तंदुरुस्ती आणि टीम इंडियामधील पुनरागमनावर त्याने भाष्य केलं असून निवडकर्त्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. Times Now शी बोलताना त्यांने आपली खंत बोलून दाखवली.
उमेश यादवने वयापेक्षा कामगिरी आणि तंदुरुस्तीला अधिक महत्त्व दिलं पाहिजे, असं स्पष्ट केलं. तसेच निवडकर्त्यांनी खेळाडूंशी पारदर्शक संवाद साधावा अशी मागणी केली आहे. त्याचं असं मत आहे की, कोणत्याही खेळाडूला संभ्रमात ठेवण्यापेक्षा थेट भूमिका स्पष्ट केल्यास संबंधित खेळाडूला पुढील निर्णय घेणे सोपे जाते. त्याच बरोबर जे खेळाडू दुखापतीतून सावरत पुन्हा मैदानात उतरतात अशा खेळाडूंना संघटना आणि राज्य असोसिएशनच्या पाठिंब्याची गरज असते. याच मुद्याला अनुसरून उमेश यादवने विदर्भ संघाकडून योग्य तो पाठिंबा मिळाला नसल्याची खंत व्यक्त केली. तसेच प्रशिक्षकाच्या भूमिकेमुळे आपल्याला संघातून बाजूला सारण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप त्याने केला.
याच कारणास्तव उमेश यादवने 2026-27 च्या देशांतर्गत हंगामापूर्वी विदर्भ संघाची साथ सोडत पंजाब संघात प्रवेश केला आहे. वयाची 39 वर्षे जवळ येत असली, तरी आपल्यामधील क्रिकेट संपलेले नाही आणि तंदुरुस्तीच्या बळावर देशासाठी पुनरागमन करण्याचे स्वप्न अद्याप जिवंत असल्याचे त्याने म्हटले आहे. निवड समितीकडून स्पष्ट मार्गदर्शन मिळाल्यास उर्वरित कारकिर्दीत अधिक जोमाने खेळता येईल, असा विश्वासही त्याने व्यक्त केला.
Comments are closed.