IPL 2027: आयपीएल 2027 पूर्वी मोठी अपडेट समोर! सनरायझर्स हैदराबादने केली मोठी अदलाबदल
आगामी काळात पुढील वर्षी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2027) तयारीला सुरुवात झाली आहे. लवकरच सर्व संघ आपापल्या संघात कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करतील. त्याआधीच खेळाडूंच्या अदलाबदलीला सुरुवात झाली आहे. आयपीएलचे एकदा विजेतेपद पटकावलेल्या सनरायझर्स हैदराबादने (Sunriserse Hydrabad) मोठी अदलाबदल केली आहे. वेगवान गोलंदाज टी. नटराजन (T. Natrajan) पुन्हा एकदा सनरायझर्स हैदराबादच्या संघात परतला आहे. यापूर्वी तो दिल्ली कॅपिटल्सच्या संघात गेला होता.
पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादने वेगवान गोलंदाज टी. नटराजनला पुन्हा आपल्या संघात घेतले आहे. नटराजनने आपल्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात सनरायझर्स हैदराबादकडूनच केली होती. तो अनेक वर्षे या संघाचा भाग होता. मात्र, त्यानंतर संघाने त्याला सोडल्यानंतर तो दिल्ली कॅपिटल्समध्ये गेला. आता सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळाडूंची अदलाबदल झाली आहे.
यानुसार, नटराजन सनरायझर्स हैदराबादमध्ये परतला आहे, तर फिरकी गोलंदाज जीशान अन्सारी (Jeeshan Ansari) दिल्ली कॅपिटल्सच्या संघात दाखल झाला आहे. म्हणजेच, लिलावापूर्वीच दोन्ही संघांमध्ये खेळाडूंची अदलाबदल झाली आहे.
आयपीएलकडून या अदलाबदलीची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. नटराजनने 2020 ते 2024 या पाच हंगामांत सनरायझर्स हैदराबादकडून खेळ केला. 2024 हा त्याच्यासाठी आयपीएलमधील सर्वात यशस्वी हंगाम ठरला. या हंगामात त्याने 19 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे, त्या हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजांमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा तो गोलंदाज होता. संघाला अंतिम फेरीपर्यंत पोहोचवण्यातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली.
आयपीएल 2025 च्या लिलावापूर्वी झालेल्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने नटराजनला 10.75 कोटी रुपयांना विकत घेतले होते. आता तो 5 कोटी रुपयांच्या सुधारित रकमेत सनरायझर्स हैदराबादच्या संघात सामील होणार आहे.
दुसरीकडे, जीशान अन्सारीने आयपीएलमधील 10 सामन्यांत 6 विकेट्स घेतल्या आहेत. तो त्याच्या सध्याच्या 40 लाख रुपयांच्या रकमेत दिल्ली कॅपिटल्सच्या संघात दाखल होणार आहे. आता हे दोन्ही खेळाडू आपल्या नव्या संघासाठी कशी कामगिरी करतात, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
Comments are closed.