सौरव गांगुली आणि अजिंक्य रहाणे यांनी ब्रिटनच्या प्रिन्ससोबत खेळला क्रिकेट, काय आहे यामागील खास कारण?

भारताचे माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली आणि अजिंक्य रहाणे पुन्हा एकदा क्रिकेट खेळताना दिसले. यावेळी कारण खूप खास होते, ज्यामध्ये त्यांनी ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स विलियम यांच्यासोबत हा खेळ खेळला. वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू ब्रायन लारा देखील या वेळी उपस्थित होते. व्हायरल फोटोमध्ये दादा प्रिन्सला गोलंदाजी करताना दिसत आहेत. दुसऱ्या फोटोमध्ये सर्व खेळाडू आणि अधिकारी एकत्र उभे असल्याचे दिसत आहे.

​सौरव गांगुली, अजिंक्य रहाणे, ब्रायन लारा यांनी प्रिन्स विलियम यांच्यासोबत एक सामना खेळला. याच्या माध्यमातून नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या ‘अर्थशॉट प्राईज अवॉर्ड’ (Earthshot Prize Awards) सोहळ्यासाठी वातावरण तयार करण्यात आले. हा सोहळा मुंबईत होणार आहे. हा मैत्रीपूर्ण सामना मंगळवारी लंडन मधील बकिंगहॅम पॅलेससमोरील ‘द मॉल’ येथे खेळवला गेला, जो टेनिस बॉलने खेळला गेला.

​सर्व खेळाडू प्रिन्स विलियम यांच्या आमंत्रणावर तिथे पोहोचले होते. 38 वर्षीय अजिंक्य रहाणे यांनी बुधवारी लिंक्डइनवर पोस्ट करत आपला अनुभव शेअर केला. या सामन्यात वेस्ट इंडिजचे ब्रायन लारा, इंग्लंडचे जो रूट आणि हॅरी ब्रुक हे देखील सहभागी झाले होते. रहाणे यांनी लिहिले की, क्रिकेटमुळे त्यांना जगातील सर्वोत्तम स्टेडियमवर खेळण्याची संधी मिळाली, पण लंडन मधील बकिंगहॅम पॅलेस येथे टेनिस बॉलने खेळण्याचा अनुभव असा आहे, जो त्यांच्या दीर्घकाळ लक्षात राहील.

​रहाणे यांनी ब्रायन लारा, सौरव गांगुली, हॅरी ब्रुक, जो रूट, प्रिन्स विलियम यांच्यासह अनेक मोठ्या व्यक्तींना भेटणे आणि त्यांच्यासोबत खेळणे हे आपले भाग्य असल्याचे म्हटले. क्रिकेटमध्ये सर्वांना एकत्र आणण्याची ताकद आहे, असेही त्यांनी लिहिले.

Comments are closed.