रणजी ट्रॉफीत रवींद्र जडेजाला सामनावीराचा पुरस्कार! सिराज-आकिब नबीच्या फॉर्मची चिंता वाढली
रणजी ट्रॉफी 2026-27 (Ranji Trophy 2026-27) च्या हंगामाला 11 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेपूर्वी भारतीय संघातील अनेक वरिष्ठ खेळाडू आपापल्या राज्याच्या संघाकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहेत. यामध्ये काही खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केली, तर काहींच्या कामगिरीमुळे चिंता वाढली आहे. भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. त्यामुळे त्याचा फॉर्म भारतीय संघासाठी दिलासादायक आहे. मात्र, वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज (Mohmmed Siraj & Aquib Nabi) आणि आकिब नबी यांना अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही.
गेल्या काही काळापासून रवींद्र जडेजाच्या फॉर्मबाबत चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, रणजी ट्रॉफी 2026-27 च्या हंगामातील सौराष्ट्रकडून खेळताना त्याने पहिल्याच सामन्यात छत्तीसगडविरुद्ध दमदार कामगिरी केली.
या सामन्यात जडेजाने फलंदाजी करताना 102 धावांची शतकी खेळी केली. त्यानंतर गोलंदाजीतही चमक दाखवत 40 धावा देऊन 3 विकेट्स घेतल्या. या अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला. हा सामना अनिर्णित राहिला. मात्र, पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर सौराष्ट्रला तीन गुण मिळवण्यात यश आले.
भारतीय संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज रणजी ट्रॉफीच्या या हंगामात हैदराबाद संघाचे नेतृत्व करत आहे. हंगामातील पहिल्याच सामन्यात हैदराबादने त्रिपुराविरुद्ध एकतर्फी विजय मिळवला. हैदराबादने हा सामना एक डाव आणि 40 धावांनी जिंकला.
मात्र, कर्णधार सिराजला स्वतःच्या कामगिरीतून विशेष छाप पाडता आली नाही. पहिल्या डावात त्याला एकही विकेट मिळाली नाही, तर दुसऱ्या डावात त्याने दोन विकेट्स घेतल्या. दोन्ही डावांत मिळून त्याने एकूण 18 षटके गोलंदाजी केली.
गतविजेत्या जम्मू-काश्मीर संघाचा मध्य प्रदेशविरुद्धचा पहिला सामना अनिर्णित राहिला. मात्र, पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मध्य प्रदेशने तीन गुण मिळवले.
या सामन्यात सर्वांचे लक्ष आकिब नबीच्या कामगिरीकडे होते. गोलंदाजांना अनुकूल असलेल्या खेळपट्टीवरही त्याला अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. त्याने दोन्ही डावांत मिळून 42 षटके गोलंदाजी केली, पण त्याला केवळ चार विकेट्स घेता आल्या.
Comments are closed.