Belly Button Hygiene: नाभी स्वच्छ करताना घ्या ही काळजी
आंघोळ करताना आपण चेहरा, हात-पाय आणि शरीराची स्वच्छता आवर्जून करतो. मात्र, शरीराचा एक छोटासा भाग अनेकदा दुर्लक्षित राहतो, तो म्हणजे नाभी. नाभीमध्ये घाम, मृत त्वचेच्या पेशी, कपड्यांचे बारीक तंतू आणि तेलकट थर जमा होऊ शकतो. त्यामुळे नाभीची स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. पण नाभी स्वच्छ करताना अतिघासणे किंवा चुकीच्या वस्तू वापरणे त्वचेला त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे नाभी स्वच्छ करताना कोणत्या चुका टाळाव्यात, हे जाणून घेऊया.
1) नाभी जोरात घासू नये
नाभी स्वच्छ करण्यासाठी नखे किंवा खडबडीत वस्तू वापरून जोरात घासणे टाळा. यामुळे नाजूक त्वचेला इजा होऊ शकते. त्याऐवजी मऊ कापडाने किंवा स्वच्छ बोटाने हलक्या हाताने स्वच्छता करा.
2) धारदार वस्तू वापरणे
नाभीतील घाण काढण्यासाठी पिन, टोकदार काडी किंवा इतर धारदार वस्तू वापरू नका. अशा वस्तूंमुळे त्वचेला जखम होण्याची आणि संसर्ग होण्याची शक्यता असते.
3) साबणाचा अतिरेक
नाभी स्वच्छ करण्यासाठी सौम्य साबण आणि पाणी पुरेसे असते. तीव्र सुगंध असलेली उत्पादने किंवा रसायने वापरल्याने काही जणांच्या त्वचेला जळजळ किंवा ॲलर्जी होऊ शकते.
4) नाभी कोरडी करा
नाभी धुतल्यानंतर तिच्या आत ओलावा राहणार नाही याची काळजी घ्या. मऊ, स्वच्छ टॉवेलने हलक्या हाताने कोरडी करा. ओलावा साचल्यास त्वचेची जळजळ किंवा बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता वाढू शकते.
‘या’ गोष्टी दुर्लक्ष करू नये
नाभीतून दुर्गंधी येणे, लालसरपणा, सूज, वेदना किंवा स्त्राव होणे अशी लक्षणे दिसल्यास केवळ स्वच्छता करून थांबू नका. डॉक्टरांचा सल्ला घ्या. नाभीची स्वच्छता राखण्यासाठी दररोज जोरात घासण्याची गरज नसते. आंघोळीच्या वेळी हलक्या हाताने स्वच्छता करणे आणि त्यानंतर नाभी कोरडी ठेवणे पुरेसे ठरते. योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास नाभी स्वच्छ ठेवता येते आणि अनावश्यक त्रास टाळण्यास मदत होते.
Comments are closed.